प्रबोधन शताब्दीनिमित्त प्रबोधनकारांच्या त्यागाचं स्मरण करायलाच हवं
सचिन परब `प्रबोधन` हे फक्त एक नियतकालिक नव्हतं, तर तो केशव सीताराम ठाकरे या फाटक्या संपादकाच्या सत्याप्रती निष्ठेचा आणि सर्वसामान्यांविषयी कळकळीचा दस्तावेज होता. आज `प्रबोधन`ची शताब्दी साजरी करताना प्रबोधनमधल्या प्रबोधनकारांच्या विचारांचं मोल नव्याने समोर येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रबोधनमधील प्रबोधनकारांच्या लेखांचा संग्रह तीन खंडांत प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील संपादकीयाचा […]
ADVERTISEMENT

सचिन परब
`प्रबोधन` हे फक्त एक नियतकालिक नव्हतं, तर तो केशव सीताराम ठाकरे या फाटक्या संपादकाच्या सत्याप्रती निष्ठेचा आणि सर्वसामान्यांविषयी कळकळीचा दस्तावेज होता. आज `प्रबोधन`ची शताब्दी साजरी करताना प्रबोधनमधल्या प्रबोधनकारांच्या विचारांचं मोल नव्याने समोर येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रबोधनमधील प्रबोधनकारांच्या लेखांचा संग्रह तीन खंडांत प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील संपादकीयाचा हा संपादित भाग.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहासलेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.