Personal Finance: सोनं-चांदी न घेता त्यांच्याच व्यवसायात बना भागीदार, कमाईची दुसरी संधी
सोनं आणि चांदी खरेदी न करताही या मौल्यवान धातूंशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. गोल्ड रिफायनिंग, रिसायकलिंग, ज्वेलरी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून गुंतवणूक कशी करता येते, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: सोनं आणि चांदी म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर दागिने, नाणी किंवा बार खरेदी करण्याचा पर्याय येतो. मात्र, या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा एक वेगळा मार्गही आहे. तो म्हणजे सोनं-चांदीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. यासाठी प्रत्यक्ष सोने किंवा चांदी खरेदी करून ठेवण्याची गरज नाही. शेअर बाजाराच्या माध्यमातून या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भागीदारी मिळवता येऊ शकते.
नेमकी कोणत्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करता येते?
1. सोने-चांदी रिफायनिंग व्यवसाय
जुन्या दागिन्यांमधून, भंगारातून आणि इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या सोन्या-चांदीवर प्रक्रिया करून त्याची शुद्धता वाढवण्याचे काम रिफायनिंग कंपन्या करतात. भारतात या व्यवसायाला मोठी बाजारपेठ आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2022 मधील अहवालानुसार, भारतातील सोन्याच्या वार्षिक पुरवठ्यात पुनर्वापरातून मिळणाऱ्या सोन्याचा वाटा सरासरी 11 टक्के होता. त्यामुळे रिफायनिंग आणि रिसायकलिंग क्षेत्राचा अभ्यास गुंतवणूकदार करू शकतात.
2. सोन्या-चांदीच्या रिसायकलिंग कंपन्या
जुने दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि औद्योगिक कचऱ्यातून मौल्यवान धातू पुन्हा मिळवण्याचा व्यवसाय वाढत्या प्रमाणात महत्त्वाचा ठरत आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटरी उद्योगातील काही घटकांमध्ये मौल्यवान धातूंचा वापर होतो. अशा धातूंचे पुनर्प्राप्तीकरण करणाऱ्या कंपन्यांचा अभ्यास करता येतो.
3. दागिने निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्या
सोन्या-चांदीचे दागिने तयार करणे, त्यांची विक्री, हॉलमार्किंग आणि बुलियन ट्रेडिंग अशा विविध व्यवसायांमध्ये कार्यरत कंपन्यांचे शेअर्स हा आणखी एक पर्याय आहे. मात्र, या कंपन्यांचा नफा केवळ सोन्या-चांदीच्या किंमतीवर अवलंबून नसतो. विक्री, ग्राहकांची मागणी, नफ्याचे प्रमाण आणि कर्ज यांचाही त्यावर परिणाम होतो.
4. चांदीचा औद्योगिक वापर करणाऱ्या कंपन्या
चांदीचा वापर केवळ दागिन्यांपुरता मर्यादित नाही. सौरऊर्जा पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध औद्योगिक उपकरणांमध्येही चांदीचा वापर होतो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचा अभ्यास करता येतो.
गुंतवणूक करण्यापूर्वी काय तपासावे?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित कंपनी प्रत्यक्षात किती व्यवसाय सोन्या-चांदीशी संबंधित करते, तिची आर्थिक स्थिती काय आहे, कर्ज किती आहे आणि भविष्यातील विस्ताराची क्षमता किती आहे, हे तपासणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील अनेक रिफायनिंग कंपन्या खासगी आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रिफायनरीचे शेअर्स शेअर बाजारात उपलब्ध असतीलच असे नाही.
अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने सोन्या-चांदीच्या दरवाढीचा थेट फायदा मिळेलच असे नाही. कंपनीचा व्यवसाय, व्यवस्थापन, स्पर्धा आणि बाजारातील परिस्थिती यांचाही शेअरच्या किमतीवर परिणाम होतो. त्यामुळे केवळ सोन्या-चांदीच्या वाढत्या भावांकडे पाहून गुंतवणूक करण्याऐवजी कंपनीचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
