सोन्याचे दागिने खरेदी करताना सावधान! भेसळी संदर्भातील दोन रिपोर्टमुळे उडाली खळबळ!
सोन्याच्या शुद्धतेबाबत समोर आलेल्या दोन रिपोर्ट्समुळे देशातील सोन्याच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सोने खरेदी करताना फसवणूक होण्याच्या शक्यतेने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता चांगलीच वाढली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारतात दागिना म्हणून वापरासाठी असो किंवा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून कायमच सोन्याकडे बघितलं जातं. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत असल्याने देशात सोन्यातील गुंतवणुकीसाठी साधारणतः दागिन्यांच्या खरेदीलाच प्राधान्य दिलं जातं. मात्र, सोन्याच्या शुद्धतेबाबत समोर आलेल्या दोन रिपोर्ट्समुळे सध्या देशातील सोन्याच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
सोने खरेदी करताना 'हॉलमार्क' म्हणजे शुद्धतेची खात्री, असंच काहीसं समीकरण सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात रूढ झालं आहे. पण भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (CAG) एका रिपोर्टने या 'हॉलमार्क'च्या विश्वासार्हतेवरच मोठं प्रश्नचिन्ह लावलं आहे. या रिपोर्टनुसार, देशातील सोन्याच्या शुद्धतेची देखरेख आणि प्रमाणीकरणासाठी जबाबदार असलेली सरकारी संस्था 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) बाजारात विकल्या जाणाऱ्या हॉलमार्कयुक्त सोन्याच्या गुणवत्तेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली आहे. या निष्काळजीपणामुळे आणि देखरेखीच्या अभावामुळे सामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे.
हे ही वाचा>> Personal Finance: जमीन खरेदी करताना कागदपत्रांमधील एक चूक.. तुमचा सगळा व्यवहार टाकेल बिघडवून
८० टक्क्यांहून अधिक दुकानांची तपासणीच नाही
सध्या देशातील नोंदणीकृत ज्वेलरी शॉपमधून विकलं जाणारं सोने शुद्धतेच्या सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करतं की नाही, याची खात्री करण्यासाठी BIS ने वर्षातून किमान एकदा तपासणी करणं आवश्यक आहे. मात्र, CAG च्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत (२०२०-२१ पासून) BIS ने ८० टक्क्यांहून अधिक नोंदणीकृत ज्वेलरी शॉपची तपासणीच केलेली नाही. देशातील ३९२ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क नसलेलं सोने विकणं हा कायदेशीर गुन्हा आहे. या अनिवार्य नियमामुळे देशभरातील सुमारे २.३ लाख सोनारांनी BIS कडे नोंदणी केली आहे. CAG रिपोर्टमधील आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशात २८,८६५ परवानाधारक सुवर्ण व्यापारी होते; त्यापैकी केवळ ५,४४४ दुकानांचीच तपासणी करण्यात आली. याचाच अर्थ असा की, सुमारे ८१ टक्के सुवर्ण व्यापाऱ्यांची वार्षिक तपासणी झालेली नाही आणि त्यांचं कुठलंही मूल्यमापन करण्यात आलेलं नाही.
नियमित तपासणीच्या अभावामुळे नियमांचं उल्लंघन होण्याची आणि सोन्यात भेसळ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. या गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणाबद्दल CAG ने BIS कडे विचारणा केली असता, BIS ने आपल्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं कारण पुढे केलं. मात्र, CAG ने हा युक्तिवाद स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता किंवा भौगोलिक आव्हानांचं कारण देऊन ग्राहकांच्या हिताशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि अनिवार्य गुणवत्ता तपासणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं CAG ने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
सोन्यात 'रेनियम' पावडरची भेसळ; चीनशी कनेक्शन?
सोन्याच्या शुद्धतेबाबत चिंता वाढवणारी दुसरी घडामोड म्हणजे सोन्यामध्ये 'रेनियम' (Rhenium) पावडरच्या भेसळीचा समोर आलेला रिपोर्ट. 'दैनिक भास्कर'च्या एका रिपोर्टमधून सोन्यातील भेसळीचा हा नवा प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याचं वजन वाढवण्यासाठी त्यात 'रेनियम' पावडर मिसळली जाते. विशेष म्हणजे, सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पारंपरिक पद्धती ही भेसळ शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत. 'दैनिक भास्कर'च्या अंदाजानुसार, सोन्याची किंमत १.५ लाख रुपये प्रति तोळा गृहीत धरल्यास अशा प्रकारच्या भेसळीमुळे ग्राहकांना प्रति तोळा सुमारे १४,७०० रुपयांचा फटका बसू शकतो.
हे ही वाचा>> Personal Finance: सोनं-चांदी न घेता त्यांच्याच व्यवसायात बना भागीदार, कमाईची दुसरी संधी
या रिपोर्टनुसार, या भेसळीचे धागेदोरे थेट चीनमधील शेनझेन शहरापर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका एजंटने दिलेल्या माहितीनुसार, त्याची कंपनी सोन्यात मिसळण्यासाठी 'रेनियम' पावडर तयार करते. ही पावडर सोन्यात मिसळल्यास पारंपरिक चाचण्यांद्वारे ही भेसळ सहजरीत्या पकडली जाऊ शकत नाही. भारतातील अनेक शहरांमध्ये आपले विक्रेते (डीलर्स) असल्याचा दावाही या एजंटने केला आहे. साहजिकच, भारतीय बाजारातही हे भेसळयुक्त सोने पोहोचलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी वर्तुळात 'सोन्याची पावडर' म्हणून ओळखलं जाणारं हे 'रेनियम' महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमार्गे भारतीय बाजारपेठेत दाखल होत असल्याचा, तसंच याचं उत्पादन चीनमध्ये होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ज्वेलर्स असोसिएशनचं म्हणणं काय?
दरम्यान, 'ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'ने सोन्यातील 'रेनियम'च्या भेसळीच्या बातम्यांमुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. सोन्यातील अशी भेसळ ओळखण्यासाठी हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ (XRF - एक्स-रे फ्लुरोसन्स) चाचणीसारख्या आधुनिक पद्धती उपलब्ध असल्याचं असोसिएशनने म्हटलं आहे. वृत्तसंस्था 'आयएएनएस' शी बोलताना असोसिएशनचे प्रमुख योगेश सिंघल यांनी सांगितलं की, सोशल मीडियावरील बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होत आहे. त्यांच्या मते, सोन्यात इतर धातू मिसळून केली जाणारी भेसळ काही नवी नाही; दागिने उद्योग गेल्या अनेक दशकांपासून अशा आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत आला आहे. सोन्यात भेसळीसाठी वापरले जाणारे असे काही धातू तस्करीद्वारे देशात आणले जात असले, तरी त्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात भेसळ करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. त्यामुळे अशा भेसळीची शक्यता कमी असून ग्राहकांनी फारशी चिंता करण्याचं कारण नाही, असा दावा सिंघल यांनी केला आहे.
