‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
मी चूक केली आणि त्याबद्दल माफी मागण्यासाठी आलो, असं म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन घेरलं. पवारांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत उलट सवाल केला.
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal vs sharad Pawar : छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात शरद पवारांनी सभा घेतली. मी चूक केली आणि त्याबद्दल माफी मागण्यासाठी आलो, असं म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन घेरलं. पवारांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत उलट सवाल केला. येवला मतदारसंघाची निवड मी केली होती, शरद पवारांनी नाही, असा दावा छगन भुजबळांनी केला.
शरद पवारांनी घेतल्या सभेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, “शरद पवार हे नाशिक आणि माझा मतदारसंघ येवल्यामध्ये आले होते. त्यांनी भाषण केले. कालच्या सभेचे नियोजन ज्या माणिकराव शिंदे यांनी केले, त्यांना 2 जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या बाहेर काढलेले आहे. ज्यांना काढलं त्यांचं पक्षासाठी योगदान तर नाही, पण येवल्यासाठीही नाही. दुसरे कुणी भेटले नाही, म्हणून त्यांचे सहकार्य घेतले.”
“जे लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतात, त्या दराडे बंधुनीही ताकद लावली होती. काल ती सगळी मंडळी स्टेजवर होती. विशेषतः दोन-तीन ज्येष्ठ मंडळी होती. त्यांच्या घरातील तरुण कार्यकर्ते माझ्या स्वागताला आलेले होते. तिथे अनेक जण असे होते जे पक्षाला त्रास देतात”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मी राष्ट्रवादी आल्यानंतर नेता झालो नाही
“2004 मध्ये शरद पवारांनी सांगितले की, तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल. त्याच्या अगोदर मी मुंबईतील माजगाव मतदारसंघातून निवडून आलेलो होतो, शिवसेनेच्या तिकिटावर. मी 1985 मध्ये शिवसेनेचा आमदार आणि नेता झालो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर नेता झालो असं नाही. शिवसेनेतील नेत्यांमध्ये मला मोठं स्थान होतं”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर पलटवार केला.