सांगली : मद्यधुंद इनोव्हा चालकाने 15 जणांना उडवलं, टिळक चौकातील घटनेनंतर ड्रायव्हरला नागरिकांकडून चोप
Sangli Hit and Run : या अपघातात नागरिकांसह वाहतूक पोलिस जखमी झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी एकत्र येत इनोव्हा कारची तोडफोड केली. यावेळी मद्यधुंद चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला. मारहाणीत तोही जखमी झाल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यासह एकूण 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली : मद्यधुंद इनोव्हा चालकाने 15 जणांना उडवलं
टिळक चौकातील घटनेनंतर ड्रायव्हरला नागरिकांकडून चोप
Sangli Hit and Run : सांगली शहरात रविवारी (दि.1) रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इनोव्हा कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत गणपती पेठ ते टिळक चौक या मार्गावर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली. या घटनेत 14 ते 15 जण जखमी झाले असून, त्यामध्ये चार वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कृष्णामाई महोत्सव सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच दरम्यान, गणपती पेठ परिसरातून एक इनोव्हा कार भरधाव वेगात येत नागरिकांना आणि पोलिसांना धडक देत पुढे जात राहिली. या गाडीने पटेल चौक मार्गे गणपती मंदिर परिसर ओलांडत टिळक चौकाच्या दिशेने जाताना अनेकांना धडक दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
या अपघातात नागरिकांसह वाहतूक पोलिस जखमी झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी एकत्र येत इनोव्हा कारची तोडफोड केली. यावेळी मद्यधुंद चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला. मारहाणीत तोही जखमी झाल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यासह एकूण 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत माहिती देताना वाहतूक पोलिसांनी सांगितलं, "सांगलीत कृष्णामाई महोत्सव सुरु असताना आम्हाला बंदोबस्तासाठी नेमण्यात आलं होतं. बंदोबस्तासाठी उभारलेलो असताना पाठीमागून इनोव्हा कारने आम्हाला धडक दिली. यामध्ये 14 ते 15 जखमी झाले आहेत. पटेल चौकमार्गे, गणपती मंदिर मार्गे तो टिळक चौकाकडे येत होता. मोठी गर्दी होती, आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत होतो, त्यावेळी हा प्रकार घडला", असं वाहतूक पोलीसांनी सांगितलं.










