गिरीश बापटांची एक्झिट! नरेंद्र मोदी ते शरद पवार… नेते झाले भावूक
पुण्याचे खासदार आणि भाजपचे नेते गिरीश बापट यांचा दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.
ADVERTISEMENT

माजी मंत्री, पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं दीर्घआजाराने निधन झालं. प्रकृती खालावल्याने गिरीश बापट यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
गिरीश बापटांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
गिरीश बापटांच्या निधनाबद्दल नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले, “गिरीश बापट एक विनम्र आणि कष्टाळू नेते होते, त्यांनी मनापासून समाजाची सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आणि पुण्याच्या विकासासात त्यांची विशेष रुची होती. त्यांचं निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि समर्थकांच्या दुःखात माझ्या सहवेदना, शांती”, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
दिलदार नेतृत्व गमावले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो.”
हेही वाचा – Girish Bapat: टेल्को कंपनीचे कामगार ते पुण्यातील भाजपचा चेहरा,असा आहे गिरीश बापटांचा राजकीय प्रवास
“नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला”, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ही पोकळी कधीही न भरून येणारी -नितीन गडकरी
नितीन गडकरींनी म्हटलं आहे, “गिरीशजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”
व्हीलचेअरवर बसून गिरीश बापटांची शेवटची प्रचारसभा #GirishBapat #Pune #BJP #MumbaiTak pic.twitter.com/sVcKiadIqN
— Mumbai Tak (@mumbaitak) March 29, 2023
“राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील.”
“महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती”, अशा शब्दात नितीन गडकरींनी शोक संवदेना व्यक्त केल्या आहेत.
गिरीश बापटाचं निधन अत्यंत दुःखद -शरद पवार
“पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
हेही वाचा – भाजपचा पुण्याचा चेहरा हरपला, गिरीश बापटांची प्राणज्योत मालवली
“माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी आदरांजली सुप्रिया सुळे यांनी बापटांना वाहिली.
मार्ग काढण्याची हातोटी असलेला नेता; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक
“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.”
“देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.”
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन #girishbapat #BJP #Devendrafadnavis
https://t.co/uGWoCNJkVL— Mumbai Tak (@mumbaitak) March 29, 2023
“पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली
“खासदार गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातील आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं.”
“टेल्को कंपनीतील कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. 2019 ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील.”
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन #girishbapat #BJP #Devendrafadnavis
https://t.co/uGWoCNJkVL— Mumbai Tak (@mumbaitak) March 29, 2023
“काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली -राज ठाकरे
“पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती”, अशा भावना राज ठाकरे यांनी गिरीश बापटांच्या निधनानंतर व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता गमावला -उद्धव ठाकरे
“भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी गिरीश बापटांच्या निधनावर व्यक्त केल्या आहेत.