खारघर दुर्घटना: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का नाही मांडली?
महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का मांडली नाही? असा सवाल आता अनेकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी आप्पासाहेब आपली भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: नवी मुंबईतील खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award Event) सोहळ्यादरम्यान, तब्बल 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर आता हळूहळू या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. सुरुवातीला हे मृत्यू उष्माघाताने झाल्याचं बोललं गेलं. मात्र, आता विरोधकांनी असा आरोप केला आहे की, चेंगराचेंगरीमुळे ही दुर्घटना घडली आहे. याबाबत आता उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील केली जात आहे. एकीकडे सरकारकडून याबाबत फारसं स्पष्टीकरण देत असल्याने आता विरोधक हे आक्रमक झाले आहेत. पण या सगळ्यामध्ये श्री सदस्यांना कुटुंबीय म्हणून संबोधणारे आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) हे अद्यापही मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (kharghar tragedy why maharashtra bhushan appasaheb dharmadhikari still hasnt presented his side in front of media)
आप्पासाहेब धर्माधिकारी मीडियासमोर येऊन आपली बाजू का मांडत नाही?
ज्या आप्पासाहेबांना पाहण्यासाठी त्यांचे लाखो श्री सदस्य हे खारघरच्या मैदानावर जमा झाले होते तेच आप्पासाहेब धर्माधिकारी एवढ्या मोठ्या दुर्घटनेबाबत मीडियासमोर येऊन आपली नेमकी बाजू का मांडत नाही असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा देखील आप्पासाहेब धर्माधिकारी किंव त्यांच्या प्रतिष्ठानाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. दुर्घटनेच्या 24 तासानंतर केवळ एक पत्रक काढून या घटनेबाबत आप्पासाहेबांनी शोक व्यक्त केला आणि या दुर्घटनेचं कोणीही राजकारण करू नये असं यावेळी सांगण्यात आलं.
दरम्यान, भर दुपारी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमावरून सध्या बरीच टीका सुरु आहे. शिंदे सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी तर असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असं सुचवलं होतं. त्याबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींना याविषयी कळविण्यात देखील आलं होतं. मात्र श्रीसदस्यांच्या मागणीनुसार हा कार्यक्रम दुपारी घेण्यात आला.