मुंबई: 76 वर्षीय आईला बेन स्ट्रोक, डॉक्टरांकडे नेलं, पण बिलाची रक्कम ऐकून रुग्णालयाकडे फिरकलाच नाही, शेवटी...
आपल्या आईच्या आजारावर उपचार करण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
76 वर्षीय आईला बेन स्ट्रोकचा आजार
मुलगा बिलाची रक्कम ऐकून नंतर रुग्णालयाकडे फिरकलाच नाही
मुलाच्या निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल
Mumbai Crime: आपल्या 76 वर्षांच्या आईच्या आजारावर उपचार करण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समोर आलं आहे. वांद्रे पोलिसांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर, ही कारवाई केल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, आरोपीवर आईच्या तब्येतीची काळजी घेणाऱ्या महिला डॉक्टरांना सुद्धा शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील होली फॅमिली हॉस्पिटल न्यायालयात गेल्यानंतर आणि आदेश जारी झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली.
दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी मुलाला त्याच्या आईला सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुलाने कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्याचा आरोप असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: मुंबईकरांनो सावधान! 'मनी लॉन्ड्रिंग' केसमध्ये अडकवण्याची धमकी... पीडित जोडप्याला तब्बल 32.8 लाख रुपयांना गंडा
जास्त बिल झाल्याने रुग्णालयात जाणंच बंद...
एफआयआरनुसार, वृद्ध महिला ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने ग्रस्त असून तिच्या मुलाने दोन महिन्यांपूर्वीच होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं होतं. मात्र, तिथे उपचारादरम्यान, डिपॉझिट रकमेपेक्षा जास्त बिल झालं आणि यामुळे संतापलेल्या आरोपीने रुग्णालयात जाणंच बंद केलं.
हे ही वाचा: सहा मुलं झाली, सुखाचा संसार सुरु असताना दुसऱ्या पुरुषावर जडला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्...
रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली माहिती
रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपी मुलगा आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेला नाही. तो केवळ ईमेलच्या माध्यमातूनच संपर्क साधायचा. त्याची आई उपचारांच्या पद्धतींनुसार कधी आयसीयूमध्ये तर कधी जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होत होती. अखेर, आरोपी आपल्या आईच्या प्रकृतीसाठी रुग्णालयात न आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. यावर कोर्टाने एक आदेश देखील जारी केला होता, मात्र मुलाने त्या आदेशाचं पालन केलं नाही. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच, वृद्ध पालकाकडे दुर्लक्ष करणे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करणे या संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.










