बीड : तुला तीन मुली झाल्या, वंशाला दिवा नाही, 25 वर्षीय विवाहितेने छळाला कंटाळून आयुष्य संपवलं
Beed Crime News : तीन मुली झाल्याच्या कारणावरून अरुणा हिला सासरी सातत्याने त्रास दिला जात होता. पहिल्या मुलीनंतर पुन्हा दोन जुळ्या मुली झाल्याने नवरा उद्धव ठोंबरे हा दारू पिऊन अरुणा हिच्याशी शिवीगाळ व मारहाण करत असल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : तुला तीन मुली झाल्या,आमच्या वंशाला दिवा नाही
25 वर्षीय विवाहितेने छळाला कंटाळून आयुष्य संपवलं
रोहिदास हातागळे / बीड : “तुला तीन मुलीच झाल्या, आमच्या वंशाला दिवा नाही,” असे टोमणे मारत सासरकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आजरखेडा, तालुका रेणापूर येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचा विवाह 16 ऑगस्ट 2019 रोजी केज तालुक्यातील उंदरी येथील उद्धव ठोंबरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात उद्धव ठोंबरे बँकेत नोकरी करत होते. मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. दरम्यान, अरुणा आणि उद्धव यांना एकूण तीन मुली झाल्या. मोठी मुलगी कु. राजनंदिनी (वय 5 वर्षे) तसेच कु. आर्या आणि कु. अपूर्वा (वय 4 वर्षे) या जुळ्या मुली आहेत. तीन मुली झाल्याच्या कारणावरून अरुणा हिला सासरी सातत्याने त्रास दिला जात होता. पहिल्या मुलीनंतर पुन्हा दोन जुळ्या मुली झाल्याने नवरा उद्धव ठोंबरे हा दारू पिऊन अरुणा हिच्याशी शिवीगाळ व मारहाण करत असल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : 'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!
इतकेच नव्हे तर सासू इंदुबाई उत्तम ठोंबरे आणि सासरे उत्तम रघुनाथ ठोंबरे हे देखील “आम्हाला मुलगा हवा होता, तुला तर 3-3 मुली झाल्या, तू आमचा वंश बुडविला,” असे म्हणत तिला घालून-पाडून बोलत, शिवीगाळ करून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या अपमानामुळे अरुणा मानसिकदृष्ट्या खचली होती. सासरकडून होत असलेल्या छळाबाबत अरुणा हिने आपल्या आई-वडिलांना, भावाला तसेच मोठी बहीण करुणा हिला वेळोवेळी फोनवरून व माहेरी आल्यानंतर सांगितले होते. “मला आता सासरी नांदायला जायचे नाही,” असे ती वारंवार म्हणत असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. मात्र, माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने दि. 10 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2:00 वाजण्याच्या सुमारास उंदरी येथील राहत्या घरी घरातील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.










