BMC वॉर्ड पुनर्रचना रद्द : उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना शिवसेना भवनात बोलवून काय सांगितलं?

BMC ward delimitation decision : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक, महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांच्य नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वॉर्ड पुनर्रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने रद्द केला. या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील शिवसेना भवनात माजी नगरसेवकांची बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे ९३ पैकी १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्यात आली असून, २२७ वॉर्ड करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक दुपारी शिवसेना भवनात घेतली.

यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या काळात तुम्हाला खुप आमिषं दाखवली जातील. आश्वासने दिली जातील. कुणाचे काही ऐकू नका. कामं करा. वॉर्डमध्ये फिरा. २०१७ ची वॉर्ड रचना त्यांनी कायम ठेवल्यानं आता आरक्षण पुन्हा येण्याची शक्यता आहे", असं उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय झालं?; किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

"उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आज मार्गदर्शन केलं. देशातील राजकीय परिस्थितीबद्दल आपण बघत आहोत, पण दुसरीकडे साथीचे आजार वाढताहेत. उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं की राजकारण होत राहिल. ते बघत राहू, पण लोकांची कामं करा, असं ते म्हणाले", अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

"शिवसेनेची लोकांसोबत बांधिलकी आहे. ती पुढेही कायम राहिल. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, मुंबईत स्वाईन फ्ल्यू आणि मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढताहेत. पण, लोकांची काम करत राहा, असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला ९३ पैकी १३ माजी नगरसेवक सोडले तर सगळे उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होवो, अथवा २३७. आम्ही सर्व जागा लढवण्यासाठी तयार आहोत", असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचनेचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकरणी शिवसेना राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१७ ची वॉर्ड रचना ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय बदलू शकतात?, असा शिवसेनेचा आक्षेप शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.

९ वॉर्ड वाढवून मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यानंतर आरक्षण सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ निवडणूक जाहीर होणे अपेक्षित असताना राज्य सरकारने निर्णय बदलणे चुकीचं आहे अशी भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळेच शिवसेना या निर्णयाला आव्हान देणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in