nashik graduate constituency election candidate Shubhangi Patil। नाशिक मतदारसंघात डॉ. सुधीर तांबेंनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे ऐनवेळी महाविकास आघाडीचं (MVA) गणित बिघडलं. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीला मतदारसंघाची आदलाबदल करावी लागली असून, नाशिक पदवीधर मतदारसंघ (nashik graduate constituency) शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आला आहे. या मतदारसंघातून सेनेनं (Shiv Sena UBT) अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दर्शवला असून, शुभांगी पाटील यांनी त्यांना कुणी समर्थन दिलंय याबद्दल भूमिका मांडलीये.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या बुलढाणा मार्गे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. परत येतांना त्या भुसावळ येथे थांबल्या होत्या. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शुभांगी पाटील म्हणाल्या, "उद्धव ठाकरे यांनी मला मातोश्रीवरून पाठिंबा दिलेला आहे. मी आता येताना नाना पटोले यांना भेटून आले आहे. अजित पवार, जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. मी महाविकास आघाडीची उमेदवार असावी म्हणून उद्धव ठाकरे हेही प्रयत्न करत आहे. मी नक्कीच महाविकास आघाडीची उमेदवार असेन."
एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल शुभांगी पाटील म्हणाल्या, "मी एकनाथ खडसे यांना संपर्क केला होता. ते मुक्ताईनगरला नाहीत, ते मुंबई आहेत. नाहीतर नक्कीच त्यांचे आशीर्वाद घेतले असते. रोहिणी खडसेही मुंबईलाच आहेत."
तुमच्याकडून संपर्क केला गेला नसल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे, असा प्रतिप्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाल्या, "मी केला. मी दुसरीकडून संपर्क केला. मी साहेबांबद्दल (एकनाथ खडसे) विचारलं, ते मुंबईत असल्याचं कळलं. मला वाटलं रोहिणी खडसेही त्यांच्याबरोबर असतील म्हणून त्यांच्याशी संपर्क केला नाही",
नाना पटोलेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल शुभांगी पाटील म्हणाल्या, "माझं नाना पटोले यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की, उद्या कळवतो. माझा पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतील आणि उद्या माध्यमांना ते कळवतील."
नाशिक पदवीधर मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झालं आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्जच न भरल्यानं महाविकास आघाडीचा गोंधळ उडाला होता. काँग्रेसमधल्या गोंधळावर शिवसेनेनं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसनंमधूनही यावर प्रतिक्रिया आल्या होत्या.
अखेर तिन्ही पक्षानी चर्चेतून मतदारसंघाची अदबाबदल केली असून, नागपूर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे, तर नाशिक पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आला आहे. शिवसेनेनं आता शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तिच भूमिका असणार आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशीच लढत बघायला मिळणार आहे.