'पिट्याभाई'चा पण भाजपात प्रवेश, राज ठाकरेंनी झापलेलं... मनसे 'पॅटर्न' सोडून 'कमळ' हाती!
Ramesh Pardeshi BJP: मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील ऐन निवडणुकीआधी ही घडामोड मनसेसाठी चिंतेंची बाब ठरू शकते.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि 'मुळशी पॅटर्न' चित्रपटात भूमिका साकारणारा पिट्याभाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी काल (18 नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश करून मनसेला जोरदार धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना आरएसएसच्या गणवेशातील फोटोवरून भर बैठकीत फटकारले होते. यानंतर परदेशी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश करताना परदेशींनी 'संघाचे संस्कार' आणि मराठी चित्रपटसृष्टीला न्याय देण्याचे कारण सांगितले. हा निर्णय मनसेसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.
'पिट्याभाई'ला राज ठाकरेंनी झापलेलं..
काही दिवसांपूर्वी, पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांसोबत पदाधिकारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये कामात दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला. याचवेळी रमेश परदेशी यांच्यावरही त्यांनी राग व्यक्त केला होता. परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचालनातील फोटो पोस्ट केले होते, ज्यात ते संघाच्या गणवेशात दिसत होते. यावरून राज ठाकरेंनी त्यांना थेट विचारणा केलेली , "तू छातीठोकपणे सांगतोस, मी संघाचा कार्यकर्ता आहे, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलास? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,"
राज ठाकरेंच्या या आक्रमक बाण्यामुळे बैठकीतील सर्वच जण अवाक् झाले होते. यामुळे रमेश परदेशी हे देखील नाराज झाले होते. पण आपली नाराजी लपवत परदेशींनी तात्काळ खुलासा देताना म्हटलेलं की, "राज साहेबांनी मला असं काही म्हटलं नाही. मी तुम्हाला सर्व अॅक्ट करून दाखवलं. माझी कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. हा अंतर्गत आणि गोपनीय विषय आहे. ज्यांनी हे बाहेर काढलं, ते पक्षाचे शत्रू आहेत."










