
पालघर जिल्ह्यातील झाई गावातल्या आश्रम शाळेत शिकत असणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला झिका व्हायरस (Zika Virus) ची लागण झाली आहे. पुण्यातल्या एनआयव्ही प्रयोगशाळेत या मुलीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतर या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रूग्ण आढळला होता.
पालघरमधल्या झाई या ठिकाणी असलेल्या आश्रम शाळेत एका नऊ वर्षांच्या मुलीचा सहा दिवसांपूर्वी ताप आल्याने मृत्यू झाला. त्यानंतर १३ विद्यार्थ्यांना डहाणूतल्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी एका विद्यार्थिनीच्या रिपोर्टमध्ये झिका व्हायरसचा तिला प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. या व्हायरसची मुख्य लक्षणं डोकेदुखी, ताप, अंगदुखी, सर्दी अशी आहेत. या विद्यार्थिनीवर सध्या डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पालघरमध्ये झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात सर्व्हेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्ह्यातील बेलसरमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. आता त्यानंतर पालघरमध्ये दुसरा रुग्ण आढळला आहे.
गेल्या वर्षी बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूच्या आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झालं होतं. 30 जुलै 2021 रोजी या महिलेचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्रात (Maharashtra) झिका विषाणूची आढळलेली ही पहिलीच रुग्ण ठरली होती. आता या महिलेपाठोपाठ पालघरची ही मुलगी दुसरी रूग्ण ठरली आहे.
झिका व्हायरस रोग हा डासांच्या चावण्यांमुळे होणारा आजार आहे आणि 80% रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही रुग्णांमध्ये ताप, शरीर दुखणे, डोळ्यांना खाज येणे, पुरळ आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात. जर हा आजार गर्भवती महिलेला झाला तर गर्भातील बाळाच्या डोक्याचा आकार कमी होऊ शकतो असं म्हटलं जात. मात्र, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही, परंतु अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.