Thane : कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल
kalwa hospital death reason : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी समितीकडून करण्यात आली. समितीने या मृत्युंसाठी कुणालाही जबाबदार ठरवलेलं नाही.
ADVERTISEMENT

Kalwa Hospital Patient Deaths : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून, अहवालातील माहितीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.
18 रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल गेल्या आठवड्यात शुक्रवारी (22 सप्टेंबर) शासनाला सादर केला आहे.
संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापले असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचे तांडव होऊन एकावरही दोषारोप करण्यात न आल्याने चौकशी समितीच्या चौकशीवरच आश्चर्य आता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >> Women Reservation History : …अन् महिला आरक्षण विधेयक खासदाराने फाडलं, काय झाल होतं 2010 मध्ये?
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमली होती. 15 दिवसांत चौकशी समिती आपला अहवाल सादर करेल, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र हा अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला बराच विलंब लागला.