Koyna Dam: तुफान पावसाने कोयना धरण तुडुंब, तब्बल 6 दरवाजे उघडले!
Koyna Dam Update: सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूट उघडण्यात आले असून कोयना नदीपात्रात 11,680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील आवक वाढली असून कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

सकलेन मुलाणी, सातारा: पश्चिम घाटासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढत असून धरणातील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. वाढती आवक लक्षात घेता धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूट उघडले आहेत.
या दरवाजांमधून सध्या कोयना नदीपात्रात 11 हजार 680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पश्चिम घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने भर पडत आहे.
हे ही वाचा>> वेदर रिपोर्ट : महाराष्ट्राच्या वेशीवर कमी दाबाचं क्षेत्र धडकलं, कुठे रेड अलर्ट?
धरणातील वाढती आवक आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापनाने धरणाच्या सहा वक्री दरवाजांचे विसर्ग सुरू केले आहेत. सध्या हे दरवाजे दोन फूट उघडण्यात आले असून त्यातून 11,680 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
