छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणात सध्या पोलीस शांतता प्रस्थापित करत असून, दोषींना अटकही केली जाणार आहे. जाणून घ्या ही संपूर्ण घटना कशी घडली
ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar violence update: बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसक घटना घडली. दोन समुदायातील तरुणांच्या गटात राडा होऊन दगडफेक आणि जाळपोळीचा प्रकार घडला. यामुळे शहरात तणाव असून, बंदोबस्त वाढण्यात आला आहे. दरम्यान, ज्या समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली, त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, समाजकंटकांनी नेमकं पोलिसांच्या तपासात अडचणी वाढतील असंच कृत्ये केले आहे. (The incident of stone pelting and arson has created tension in Chhatrapati Sambhajinagar.)
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील एका भागात हिंसाचार उफाळून आला. दोन गटातील तरुणांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. त्यामुळे शहरात खळबळ माजली होती. मात्र, पोलिसांनी रात्रीतून बंदोबस्त वाढवत शांतता प्रस्थापित केली आहे. त्याचबरोबर अफवांकडे लक्ष न देता राम नवमी साजरी करण्याचे आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
राज्य राखीव दलाच्या तुकड्या, काही भागांना छावणीचं स्वरुप
राम नवमीच्या दिवशीच दोन समुदायातील तरुणांमध्ये ही हिंसक घटना झाली असल्याने पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असून, पोलिसांकडून राज्य राखीव दलांच्या चार तुकड्या तैनात केल्या आहेत, अशी माहिती एसआरपी अधीक्षक निमित्त गोयल यांनी दिली. त्यामुळे शहरातील काही भागांना छावणीचं स्वरुप आले आहे.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात जाळपोळ… संजय राऊत म्हणाले, “मिंधे गटाच्या टोळ्या…”
चार जण जखमी; राम मंदिराला राजकीय नेत्यांच्या भेटी
रात्री झालेल्या हिंसाचारात चार लोक जखमी झाले असून, त्यांच्या प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. घटनेनंतर किराडपुऱ्यातील राम मंदिराला राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील आणि इतर आमदारांचाही समावेश आहे.