चॅटजीपीटी वापरताना सापडला, आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; संतप्त विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने

मुंबई तक

आयआयटी पवई येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संस्थेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

ADVERTISEMENT

IIT Student Suicide
IIT Student Suicide
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चॅटजीपीटी वापरताना सापडला

point

आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

point

संतप्त विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने

IIT Student Suicide : देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था असलेल्या आयआयटी पवईमध्ये शुक्रवारी (18 सप्टेंबर) संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने कॅम्पसमधील एच-4 वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेनंतर संस्थेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

चॅट जीपीटीवरुन उत्तरे आणि निलंबनाची धमकी

आयआयटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्याला मोबाईलवर 'चॅटजीपीटी'च्या माध्यमातून उत्तरे शोधताना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून त्याच्यावर कोणतीही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, असे त्याला आश्वासित करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी हा दावा फेटाळून लावत प्रशासनावर सत्य लपवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर साहिलला एक वर्षाच्या निलंबनाची (सस्पेन्शन) धमकी देण्यात आली होती. या निलंबनामुळे वसतिगृहातून काढले जाण्याची आणि पदवी वेळेत पूर्ण न होण्याची भीती होती, याच मानसिक दबावाखाली साहिलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : Sanjay Raut Interview : तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?

पिंजऱ्यात असल्यासारखे वातावरण

या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधील वातावरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. संस्थेत एखाद्या 'पिंजऱ्यात' असल्यासारखे गुदमरवणारे वातावरण असून प्राध्यापकांचा अनावश्यक दबाव आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत भीतीचे सावट असते, अशी व्यथा त्यांनी मांडली. गेल्या वर्षभरात कॅम्पसमध्ये झालेल्या अन्य आत्महत्यांचा संदर्भ देत, प्रशासनाने अद्याप कोणाचीही जबाबदारी निश्चित केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक प्रोफेसर शिरीष बी. केदारे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची ठाम मागणी केली आहे. सुरुवातीला प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यावरूनही वाद झाला होता, पण नंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पत्रकारांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची परवानगी मिळाली.

हे ही वाचा : चक्राकार वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस, जोर वाढणार; कुठे-कुठे येलो अलर्ट?

'तोडगा काढला जाईल'

या वाढत्या तणावावर प्रतिक्रिया देताना आयआयटी पवईचे संचालक प्रोफेसर शिरीष बी. केदारे यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण घटनाक्रमाची नैतिक जबाबदारी आपली असून या प्रकरणात पूर्ण उत्तरदायित्व निश्चित केले जाईल. मात्र, राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी कोणतेही थेट उत्तर देणे टाळले. दुसरीकडे, मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्तात्रेय नलावडे यांनी परिस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये साहजिकच संताप आणि तणाव आहे, परंतु आयआयटी प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद सुरू आहे. चर्चेच्या माध्यमातून लवकरच शांतता प्रस्थापित करून यावर योग्य तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.