कल्याणमध्ये कुत्र्यांचा कहर! 24 तासांत तब्बल 161 जणांना चावा, KDMC चा संतापजनक कारभार
कल्याण पश्चिममध्ये अवघ्या 24 तासांत 161 हून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये एक 11 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
ADVERTISEMENT

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिममधून भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोड परिसरासह शहरातील काही भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मोठ्या संख्येने नागरिकांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. रविवार दुपारपासून सोमवार दुपारपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 161 हून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे कल्याणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोडसह अनेक भाग प्रभावित
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोड, जुन्या RTO कार्यालयाच्या आसपासचा परिसर आणि भोईरवाडी हे भाग सर्वाधिक प्रभावित असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा>> तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सवर ‘सर्जिकल स्ट्राइक’! कुठे झुरळांचा सुळसुळाट तर कुठे किचनशेजारी टॉयलेट!
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावत होते. बाइकस्वार आणि रिक्षाचालकांचाही पाठलाग केला जात होता. संधी मिळताच नागरिकांना कुत्रे चावा घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
