पोलिसांच्या गाडीसमोर उभी राहिली, आंदोलकांना सोडवलं ती मुलगी काय म्हणाली?
मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवून आंदोलकांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या वाहनासमोर ठामपणे उभी राहिलेल्या या तरुणीची भूमिका, तिची ओळख आणि संपूर्ण घटनाक्रमाची चर्चा आता राज्यभर सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसांच्या गाडीसमोर उभी राहिली,
आंदोलकांना सोडवलं ती मुलगी काय म्हणाली?
Mumbai Protest Girl : दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले असून, शिक्षण क्षेत्रातील गोंधळ आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कात आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या व्हॅनसमोर धाडसाने उभी राहून विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीर अटकेला विरोध करणारी अभिनेत्री व उद्योजक रिया अहिर हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वाढत्या जनक्षोभाच्या आणि युवा पिढीच्या या आक्रमक भूमिकेमुळे या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
'यामुळे' व्हॅन रोखली
आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रसंगाबाबत बोलताना रियाने सांगितले की, शिवाजी पार्क परिसरात आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी एका व्हॅनमध्ये खच्चून भरले होते आणि आतून मुले 'We Want Justice' च्या घोषणा देत होती. पोलिसांकडे विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे कोणतेही कायदेशीर मेमो किंवा लेखी आदेश नसल्याचे लक्षात येताच रियाने पोलिसांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्याने आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे पाहून ती थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या नाट्यमय घडामोडीत तिने पोलिसांना बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापासून रोखले.
हे ही वाचा : पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील; तरुण पोलिसांकडे पोहोचला अन्...
चुकीच्या पिढीशी पंगा
या आंदोलनाच्या माध्यमातून आजची 'जेन-जी' (Gen-Z) म्हणजेच तरुण पिढी प्रशासकीय दिरंगाई आणि अन्यायाविरोधात एकत्र आल्याचे रियाने स्पष्ट केले. आपल्या पालकांच्या पिढीप्रमाणे शांत बसून किंवा तडजोड करून सर्व काही सहन करणे आता शक्य नसल्याचे सांगत तिने, "प्रशासनाने चुकीच्या पिढीशी पंगा घेतला आहे," असा थेट इशारा दिला. पेपरफुटी, विद्यापीठांचा भोंगळ कारभार, शिक्षणावरील वाढता कर आणि तरुण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यांवर सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये हा तीव्र असंतोष खदखदत असल्याचे तिने नमूद केले.
हे ही वाचा : दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा, राहुल गांधी भडकले
लढण्याचा ठाम निर्धार
कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न चालवता हा लढा पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाहीच्या चौकटीत राहूनच लढला जाईल, असेही रियाने आवर्जून सांगितले. न्यायासाठी आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, कायदेशीर मार्गाने ई-मेल, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा पुढे नेण्याचे आवाहन तिने केले. जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर होत नाहीत आणि विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा ठाम निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला आहे.
