मुंबईच्या 24 वर्षीय रिद्धीचा दुर्दैवी मृत्यू, 'ती' Trip ठरली शेवटची.. नेमकं काय घडलं?
मुंबईच्या रिद्धी ठक्कर यांचा छत्तीसगडमधील धमतरी येथे भीषण अपघातात मृत्यू झाला. बस्तरला बाइकवरून जात असताना भरधाव ट्रेलरने मागून धडक दिली. जाणून घ्या संपूर्ण घटना.
ADVERTISEMENT

धमतरी: छत्तीसगडमधील बस्तरच्या निसर्गरम्य परिसराची सफर करण्यासाठी मुंबईहून बाइकवर निघालेल्या रायडर्सच्या ग्रुपमधील 24 वर्षीय रिद्धी ठक्कर हिचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. धमतरी जिल्ह्यातील एनएच-30 वरील मरकाटोला घाटाजवळ भरधाव ट्रेलरने तिच्या बाइकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान रिद्धीचा मृत्यू झाला.
23 बाइक रायडर्सचा ग्रुप निघालेला बस्तरला
रिद्धी ठक्कर ही मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात राहत होती. सुमारे 23 बाइक रायडर्सचा ग्रुप बस्तरमधील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी छत्तीसगडमध्ये आला होता. बुधवारी पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ग्रुपमधील बहुतांश रायडर्स पुढे निघून गेले होते. रिद्धी काही सहकाऱ्यांसोबत मागे राहिली होती. त्याचवेळी मरकाटोला घाटाजवळ हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रिद्धी MH 12 SP 0835 क्रमांकाच्या बाइकवरून प्रवास करत होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने तिच्या बाइकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिद्धी रस्त्यावर फेकल्या गेली आणि तिला गंभीर दुखापत झाली.
हे ही वाचा>> फॉर्च्युनरचा वेग 150, मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला? पोलिसांनी सांगितलं...
अपघातानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदत केली. डायल-112च्या मदतीने रिद्धीला चारामा आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
