मुंबईची खबर : रविवारचा मेगा ब्लॉक, तुमच्या मार्गावर लोकल वेळेवर धावणार की उशिरा?
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी (20 सप्टेंबर) कुठे-कुठे मेगाब्लॉक असेल, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : रविवारचा मेगा ब्लॉक
तुमच्या मार्गावर लोकल वेळेवर धावणार की उशिरा?
Mumbai News : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी (20 सप्टेंबर) मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक केवळ ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गावर घेण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकची वेळ रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत संबंधित रेल्वे रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे आवश्यक काम पूर्ण केले जाईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले
या मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, 'डाऊन' दिशेने जाणाऱ्या काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ब्लॉकच्या वेळेत या 'डाऊन' गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावरून वळवण्यात येतील. मार्गातील या बदलामुळे ब्लॉक कालावधीत धावणाऱ्या या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा : आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर अपघाताच्या दोन घटना, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करा
याचप्रमाणे, 'अप' दिशेने मुंबईकडे येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या मेगा ब्लॉकचा परिणाम दिसून येणार आहे. 'अप' दिशेच्या काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावरून वळवण्यात येतील. परिणामी, ब्लॉक कालावधीत प्रवास करणाऱ्या या गाड्या पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
हे ही वाचा : चक्राकार वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस, जोर वाढणार; कुठे-कुठे येलो अलर्ट?
'या' लाईन्सवर ब्लॉक नाही
असे असले तरी, लोकलने प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांसाठी मात्र रविवारी मोठी दिलासादायक बाब आहे. मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण विभाग आणि हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गांवर कोणताही 'मेगा ब्लॉक' घेतला जाणार नाही. याशिवाय, ट्रान्स-हार्बर लाईन आणि बेलापूर-उरण पोर्ट लाईनवरही रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे या सर्व मार्गांवरील लोकल वाहतूक रविवारी नेहमीप्रमाणे पूर्णपणे सुरळीत सुरु राहील.
