ठाणे : बेपत्ता अरबाज खानची बॉडी गटारीतील हिरव्या ड्रममध्ये सापडली, पोलिसांकडून मोठा उलगडा!
Mumbra murder case : मुंब्र्यातून बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाची खंडणीसाठी त्याच्या प्रियसीने, तिच्या पतीने आणि भावाने मिळून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार एक महिन्यानंतर उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बेपत्ता तरुणाचा मृतदेह गटारीतील ड्रममध्ये सापडला
पोलीस तपासातून सगळा उलगडा
Mumbra murder case : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. मुंब्र्यातून अचानक बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाचा त्याच्याच प्रियसीने पती, भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने खून केल्याचे एका महिन्यानंतर तपासात निष्पन्न झाले आहे. 3 एप्रिल 2026 रोजी अरबाज हा दादर येथे आपल्या कामाचे पैसे घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला होता, मात्र तो परत न आल्याने त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मयत अरबाज आणि त्याची प्रेयसी मेहजबीन शेख या दोघांचे मोबाईल लोकेशन वसई परिसरात एकाच दिवशी एकत्र आल्याचे आढळून आले. या संशयावरून पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता तिने या थरारक हत्याकांडाची कबुली दिली.
हेही वाचा : धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या
मेहजबीनने दिलेल्या कबुलीनुसार, तिने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि त्याचा मित्र मुज्जुम पठाण यांच्यासोबत मिळून अरबाजकडून खंडणी वसूल करण्याचा आणि त्याला जिवे मारण्याचा कट आधीच रचला होता. या पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून त्यांनी अरबाजला वसई येथे बोलावून घेतले आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, अरबाजकडे पैसे नसल्याने आरोपींनी क्रूरतेची सीमा पार करत त्याचे हातपाय बांधले आणि त्याला प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करून जिवे ठार मारले. हत्येनंतर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी अरबाजचा मृतदेह एका मोठ्या हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरला आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी असलेल्या नाल्यात (गटारीत) फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावली.
हेही वाचा : पुणे : 'या' कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवला बॉम्ब, आरोपीचा धक्कादायक खुलासा









