नागपूर हादरलं, महागडी कार अन् मोबाईल पाहून बी-टेकच्या विद्यार्थ्यांची नियत फिरली, सेल्समनची दगडाने ठेचून हत्या

योगेश पांडे

Nagpur Crime News : नागपुरात एका 44 वर्षीय सेल्समनची त्याच्या कार आणि 2 मोबाईलच्या लालचेपोटी तीन बी-टेक विद्यार्थ्यांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर हादरलं, महागडी कार अन् मोबाईल पाहून बी-टेकच्या विद्यार्थ्यांची नियत फिरली

point

सेल्समनची दगडाने ठेचून हत्या

Nagpur Crime News : नागपूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कार आणि २ मोबाईलच्या शुल्लक लालचेपोटी अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी एका ४४ वर्षीय सेल्समनची निर्घृण हत्या केली आहे. मृत व्यक्तीची ओळख त्रिमूर्तीनगर, वाडी येथील रहिवासी सुचित उपासराव भोजापूरे (४४) अशी पटली आहे. ही खळबळजनक घटना गुरुवार २ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली असून, ४ एप्रिल रोजी सकाळी या हत्याकांडाचा उलगडा झाला. प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात बी-टेकचे शिक्षण घेणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांनी केवळ एका रात्रीत गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकत सुचित यांचा शिरकाव दगडाने ठेचून अंत केला आणि त्यांचा नग्न मृतदेह खड्गाव रोडवरील जंगलात फेकून दिला.

मदत करण्याच्या बहाण्याने घातला हत्येचा घाट

मूळचे पवनी, भंडारा येथील असलेले सुचित भोजापूरे हे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करायचे. २ एप्रिलच्या रात्री सुचित हे वर्धमाननगर येथील जैन मंदिराजवळ आपल्या लाल रंगाच्या कारमध्ये (क्रमांक MH/40/BJ/1810) दारूच्या नशेत बसलेले असताना या तीन आरोपी विद्यार्थ्यांची त्यांच्यावर नजर पडली. आर्यन नरेश शेंडे (२२), रिशांख तारेश कांबळे (१९) आणि अनुज रमेश वाघमारे (१९) या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला त्यांना कार रस्त्याच्या कडेला लावण्याचा सल्ला दिला. मात्र, नशेत असलेल्या सुचित यांनी त्यांना १० किमी दूर भिवापूर येथे सोडण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांनी त्यांना भिवापूरला नेले आणि तिथून पुन्हा वाडीला सोडण्यासाठी परत आणले. मात्र, वाडीतील त्यांच्या घराला कुलूप असल्याने आणि पत्नीने फोनवर प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थ्यांनी सुचित यांना सोबतच ठेवले.

मदत करण्याच्या हेतूने सोबत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनात सुचित यांची कार आणि त्यांच्याकडील २ मोबाईल पाहून अचानक वाईट विचार येऊ लागले. कार आणि महागडे मोबाईल हस्तगत करण्याच्या लालचेपोटी त्यांनी सुचित यांना खड्गाव रोडवरील एका निर्जन स्थळी नेले. तिथे या तिघांनी मिळून सुचित यांचे डोके दगडाने ठेचून त्यांची क्रूरपणे हत्या केली. एवढेच नाही तर, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी सुचित यांच्या शरीरावरील सर्व कपडे काढून टाकले. त्यांचा नग्न मृतदेह लावा स्मशानभूमीजवळील झुडपात फेकून देऊन हे तिघेही कार घेऊन पसार झाले. शुक्रवार ३ एप्रिल रोजी गुन्हे शाखेला या अज्ञात मृतदेहाची माहिती मिळाली, ज्यानंतर तपासाला वेग आला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद

सुचित यांचे वडील उपासराव भोजापूरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला होता. गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे समांतर तपास सुरू केला असता त्यांना आर्यन शेंडेबद्दल संशयास्पद माहिती मिळाली. पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने आपल्या इतर दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. हे तिन्ही आरोपी नंदनवन भागातील एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये बी-टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी आहेत. केवळ काही क्षणांच्या मोहाने या उच्चशिक्षित तरुणांचे भविष्य आता अंधारात लोटले असून, पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

हे वाचलं का?