मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे? खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
Panvel News : मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे? खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पनवेलमधील मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे?
खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
पनवेल : खारघर परिसरात आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सुपूर्द झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा आरोप होत असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही चूक झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन्ही मृत व्यक्ती नेपाळच्या असल्याने अदलाबदल झाल्याची चर्चा
खारघरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाने काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पनवेल येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह परत देताना पोलिसांच्या उपस्थितीत तो चुकीने दुसऱ्या एका नेपाळी कुटुंबाला देण्यात आला. योगायोगाने त्या कुटुंबातील तरुणाचाही मृत्यू झाला होता आणि दोन्ही मृत व्यक्ती मूळचे नेपाळचे असल्याने ओळख करण्यात गोंधळ झाला. परिणामी, त्या कुटुंबाने सुशांत मल्ला याचाच मृतदेह आपला समजून त्यावर अंत्यसंस्कारही केले.
"पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सुपूर्द केला जातो"
दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन मृतदेह मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह रुग्णालय प्रशासन नव्हे, तर तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सुपूर्द केला जातो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चुकीसाठी पोलिसच जबाबदार असल्याचे चित्र समोर आले आहे.










