Vidyanand Bapat Interview : मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?
डीजे विरोधात विद्यानंद बापट रोखठोक भूमिका मांडत आहेत. विद्यानंद बापट एका वाहिनीला मुलाखत देत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतरही बापट मागे हटले नाहीत. ते त्यांचे मुद्दे मांडत आहेत. बापटांची पूढची भूमिका काय असणार यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?
नेमकं काय म्हणाले?
Vidyanand Bapat Interview : पुण्यामध्ये गणेशोत्सवात होणाऱ्या डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात ठाम भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहेत. गणेशोत्सव पूर्णपणे डीजे व ध्वनिक्षेपक मुक्त असावा, अशी त्यांची प्रमुख मागणी असून, या भूमिकेमुळे त्यांना सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, काल त्यांची भूमिका मांडत असताना त्यांच्यावर एक हल्ला झाला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असले, तरी आपण आपल्या भूमिकेवर पूर्णपणे अचल व ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्सव कालसुसंगत पद्धतीने साजरे व्हावेत
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार आणि आयटी हब झालेल्या पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी उत्सव कालसुसंगत पद्धतीने साजरे झाले पाहिजेत, असे बापट यांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणांऐवजी बंदिस्त सभागृहांमध्ये किंवा नियमानुसार हे उत्सव व्हावेत, जेणेकरून इतरांच्या अधिकारांवर व शांततेवर गदा येणार नाही. सोलापूर आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये डीजेवर बंदी आणली जाऊ शकते, तर मग पुणेकरांनीही या विकृतीचे समर्थन न करता सुधारणा करायला हवी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
हे ही वाचा : पुणे मेट्रो : विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर
अन्य व्यवसायांत पुनर्वसन शक्य
या भूमिकेवर काहींनी त्यांच्या नास्तिक असण्याचा मुद्दा पुढे करत आक्षेप घेतला, तर काहींनी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना बापट यांनी स्पष्ट केले की, हे मुद्दे धार्मिक स्वातंत्र्याचे नसून नागरिकांच्या जगण्याच्या आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे आहेत. तसेच, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग किंवा इतर जुन्या प्रथा बंद करताना जसे लोकांचे पुनर्वसन केले गेले, तसेच या क्षेत्रातही योग्य बदल करून लोकांचे अन्य व्यवसायांत पुनर्वसन करणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा : Personal Finance: घरात 'एवढे' पैसे रोख ठेवले तर वर्षभरात किती नुकसान? जाणून घ्या पैशांचा खरा हिशोब
'बलप्रयोग करणाऱ्यांना भीत नाही'
काल झालेल्या हल्ल्यामुळे आपल्या निश्चयात कोणताही फरक पडला नसून, तार्किक प्रतिवाद न करता अशा प्रकारे बलप्रयोग करणाऱ्यांना ते भीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चळवळीला आता हळूहळू संघटित स्वरूप येत असून, विविध स्तरांतून नागरिक व सामाजिक कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देत आहेत. भविष्यात या मागणीला अधिक व्यापक आणि ठोस स्वरूप देण्यासाठी लवकरच अधिकृतपणे पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, असे संकेत त्यांनी मुलाखतीदरम्यान दिले आहेत.
