कमी दाबाचा पट्टा, कसा परिणाम होणार? महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस?
महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांच्या पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. याचा महाराष्ट्रावर नेमका किती परिणाम होणार? पुढील 7 दिवसांत राज्यात कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे? पावसाचा जोर वाढणार की पावसाची उघडीप कायम राहणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कमी दाबाचा पट्टा, कसा परिणाम होणार?
महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस?
Maharashtra Weather : महाराष्ट्र आणि देशातील हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता आगामी आठवड्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या अरबी समुद्र आणि लगतच्या राज्यांमध्ये पोषक वातावरण तयार होत असून उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच गुजरात ते मध्य प्रदेश दरम्यान 'ॲटमॉस्फेरिक ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) तयार झाल्याने अरबी समुद्रातील आर्द्रता खेचली जात आहे. याचा थेट परिणाम म्हणून 7 ते 13 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात, विशेषतः कोकण पट्ट्यात आणि इतर भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 ते 13 सप्टेंबरदरम्यान कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 10, 11 आणि 12 तारखेला कोकण किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव अधिक दिसून येऊ शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात लगतच्या भागांत आयसोलेटेड ते स्कॅटर्ड स्वरूपाचा, म्हणजेच काही ठराविक ठिकाणच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा : MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांनी लिहिलेले पोस्टर, VIDEO पाहाच
हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
येत्या तीन दिवसांचा विचार करता, 8 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व नाशिकच्या घाटमाथ्यावरही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. मात्र, सध्यातरी कुठल्याही भागासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग संथ, पुढील काही तास महत्त्वाचे
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे...
9 आणि 10 सप्टेंबर रोजीदेखील राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात पाऊस हलक्या स्वरूपात हजेरी लावेल, तर 10 तारखेला नांदेड भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जरी सध्या मुसळधार पावसाचा मोठा इशारा नसला, तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुढील आठवड्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
