
कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाचं अपहरण करुन त्याला बदलापूर येथील जंगलात नेऊन त्याच्याजवळील सोन्याची चेन आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत. जगदीश पवार असं या शिक्षकाचं नाव असून घडलेल्या प्रकारानंतर कोळशेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मलंगगड भागातील ढोके केंद्रावर जगदीश पवार हे शिक्षक आहेत. बुधवारी सकाळी नियमितपणे ते आपल्या कल्याण पश्चिमेतील घरून शाळेत जात होते. यावेळी सकाळी कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात आरोपी प्रथमेश वाकुर्ले हा तरुण घरी जाण्यासाठी शिक्षक जगदीश पवार यांना हात करू लागला. शिक्षकाने देखील ओळखीचा तरुण असल्याने त्याना ढोके गावात जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात प्रवेश दिला. यानंतर काही अंतरावर आरोपी प्रथमेश याने आपल्या दोन साथीदारांनाही शिक्षकाच्या गाडीत घेतले. यानंतर अपहरणकर्त्यांनी आपला खरा डाव साधायला सुरुवात केली.
अपहरणकर्त्यांनी जगदीश पवार यांना तुमचे महिलेशी संबंध असल्याच्या जाब विचारण्यासाठी तिच्या मामाकडे घेऊन जात असल्याचे सांगत त्यांच्या गळ्याला चॉपर लावला. यानंतर त्यांनी जगदीश यांना बदलापूर परिसरातील मुळगावच्या पुढे असलेल्या एका जंगलात गाडी घ्यायला सांगितली. इथे पोहचल्यानंतर त्यांनी जगदीश यांना कच्ची दारू पाजून त्यांच्या खिशातील असलेले पैसे, गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतले. इतकच नव्हे तर फोन पे द्वारे त्यांच्या बँक खात्यातील पैसेही ट्रान्स्फर करून घेतले. यानंतर जगदीश यांच्या गळ्याला चॉपर लावत आरोपींनी धार्मिक तेढ निर्माण होईल आणि महिलांना त्रास होईल असे व्हिडीओ तयार करवून घेतले.
पोलिसांत तक्रार केली तर हे व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिल्यानंतर जगदीश यांनी पोलिसांत तक्रार न करण्याची हमी दिली. ज्यानंतर हे अपहरणकर्ते शिक्षक जगदीश यांना पुन्हा कल्याण परिसरात घेऊन आले. दरम्यान यातून सावरल्यानंतर जगदीश यांनी आपल्या मित्रांच्या साथीने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी प्रथमेश वाकुर्ले, सराईत गुन्हेगार प्रदीप खापरा आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.