
डोंबिवली शहरात चार तरुणांनी ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या एका तरुण व त्याच्या दोन साथीदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून 50 लाखांची खंडणी मागितली आहे. इतकच नव्हे तर या चार आरोपींनी रस्त्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. चार जणांच्या टोळक्याने तिघांचा पाठलाग करत घरडा सर्कलजवळ गाडी थांबवत त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. परंतू पीडित तरुण मोठ्या शिताफीने आरोपींच्या तावडीतून सुटले. परंतू यानंतरही हार न मानता आरोपींनी पाठलाग करत या तिन्ही तरुणांना शेलार चौकात पुन्हा अडवलं.
यावेळी आरोपींनी स्वतःच्या वाहनातील काठ्या नाचवत, मध्ये कोणी आलं तर पाहून घेऊ अशी धमकी देत पीडित तरुणांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश पाटील, राजेंद्र माने, कैलास गायकवाड, दीपक गायकवाड या चार तरुणांनी मेहुल जेठवा आणि त्याच्या दोन साथीदारांना अडवून पिस्तुलाच्या धाकावर 50 लाखांची खंडणी मागितली.
दरम्यान मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.