समीर वानखेडे-क्रांती रेडकरच्या घरात चोरी; लाखोंची रक्कम अन् दागिन्यांवर डल्ला

Sameer Wankhede - Kranti Redkar : चोरी झाल्याचं उघडकीस येताच घरातील काम करणारी महिला गायब
अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे.
अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे.Mumbai Tak

मुंबई (दिपेश त्रिपाठी) :

कॉडिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या घरी चोरी झाल्याचं समोर येत आहे. घरातील काम करणाऱ्या महिलेनेचं चोरी करुन पोबारा केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरातून जवळपास साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा यात समावेश आहे. चोरी झाल्याचं उघडकीस येताच घरातील काम करणारी महिला गायब असून तिनेच हात साफ केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे.

क्रांतीने काही दिवसांपूर्वीच एका एजन्सीच्या माध्यमातून घर कामासाठी एका महिलेला कामावर घेतलं होतं. क्रांतीच्या तक्रारीनंतर पोलीस सध्या याच एजन्सीमध्ये संबंधित महिलेबद्दल चौकशी करत आहेत. संबंधित महिला नेमकी कुठली, कामावर ठेवण्यापूर्वी तिची पोलीस चौकशी झाली होती का, एजन्सीला कायदेशीर मान्यता आहे का? यापूर्वी अशा काही तक्रारी आल्या आहेत का? अशा अॅन्गलने पोलीस सध्या तपास करत आहेत.

क्रांती रेडकर - समीर वानखेडे कोण आहेत?

क्रांती रेडकर ही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका आहे. क्रांतीने जत्रा, ऑन ड्युटी २४ तास ,माझा नवरा तुझी बायको,नो एन्ट्री पुढे धोका आहे, शिक्षणाचा आयचा घो,फक्त लढ म्हणा, मर्डर मेस्त्री या सिनेमात काम केलं. मात्र क्रांतीला खरी ओळख मिळाली ती जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली या गाण्यामुळे. हे गाणं इतकं गाजलं की क्रांती घराघरात जाऊन पोहचली. यानंतर क्रांती दिग्दर्शनाकडे वळली आणि तिने मराठीत काकण हा सिनेमा दिग्दर्शित केला.

तर समीर वानखेडे हे एक IRS अधिकारी आहेत. यापूर्वी ते NCB मध्ये प्रतिनियुक्तीवर असताना मुंबईचे झोनल अधिकारी होते. क्रांती रेडकरने २०१७ साली समीर वानखेडे यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर क्रांती चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर गेली. क्रांती आणि समीर वानखेंडेंना जुळ्या मुली आहेत. आपल्या सोशल मिडियावरून क्रांती नेहमीच अनेक पोस्ट करत असते. याचबरोबर क्रांतीचा कपड्यांचाही व्यवसाय आहे. झिया-झायदा असं क्रांतीच्या ब्रँण्डचं नाव आहे. यासोबत क्रांतीने क्रँकर हा ज्वेलरी ब्रँडसुध्दा लॉंच केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in