chandrapur : बायको सोडून गेली! बापाचं हादरवून टाकणारं कृत्य, मुलाचा…
चंद्रपूर तालुक्यातील राजोळी गावात बापाने मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नी घर सोडून गेल्यामुळे त्याने हे कृत्य केलं.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. बायको सोडून गेल्यामुळे आलेल्या तणावातून बापाने तीन वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर चाकून स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने सुसाईड नोट लिहिली. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. (father killed son in Chandrapur, Maharashtra News)
ही घटना घडली चंद्रपूर जिल्ह्यातील राजोळी गावात. रविवारी पहाटे पाच वाजता मद्यधूंद अवस्थेत असलेल्या बापाने पोटच्या तीन वर्षाच्या मुलाचा गळा घोटला. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हत्या करण्यात आलेल्या तीन वर्षीय मुलाचं नाव प्रियांश गणेश चौधरी असं आहे. तर हत्या करणाऱ्याचं नाव गणेश विठ्ठल चौधरी (वय 31) असं आहे.
मुलाची हत्या करण्यापर्यंत प्रकरण का गेलं?
31 वर्षीय गणेश विठ्ठल चौधरी पत्नी काजल आणि मुलगा प्रियांशसोबत राजोळीमध्ये राहत. मिळालेल्या माहितीनुसार गणेशला व्यसन जडलेलं आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी त्याने मद्यप्राशन करून पत्नीला मारहाण केली. त्यामुळे पत्नी घर सोडून निघून गेली.
हेही वाचा >> 18 बॉयफ्रेंड, 1 नवरा अन् कोट्यावधींची फसवणूक : महिला अशी अडकवायची सापळ्यात
पत्नी घर सोडून निघून गेल्यामुळे गणेश चौधरी तणावाखाली होता. दरम्यान, दारू प्राशन करून आलेल्या गणेश चौधरीने रविवारी पहाटे मुलगा प्रियांशची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गणेश चौधरीच्या सुसाईड नोटमध्ये काय?
मुलाची हत्या आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी गणेशने एक सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये त्याने चुलत भाऊ नानाच्या नावाचा उल्लेख केला आहे.
सुसाईड नोटमध्ये त्याने मुलाला आणि मला एकाच तिरडीवरून नेण्यात यावं, असं म्हटलं आहे. “दोघांनाही एकाच खड्ड्यामध्ये दफन करा. माझ्यानंतर मुलाची काळजी घेणार कुणीही नाही, त्यामुळे मी त्याला सोबत घेऊन जात आहे. मला माफ करा. ही माझी मोठी चूक आहे. ओके गुड बाय. मी जात आहे. आय लव्ह यू प्रियांश. सॉरी”, असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
बाप वाचला, पण मुलगा गेला
या घटनेत प्रियांशचा मृत्यू झाला, तर बाप गणेश चौधरी वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून गणेशला रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, प्राथमिक तपासानुसार नैराश्यात येऊन आरोपीने हे केले आहे. आरोपी रुग्णालयात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.