TET Paper Leak Case: फरार आरोपी सोनू कुमार थेट भिवंडी कोर्टासमोर, आत्मसमर्पण केलं अन्...
TET Paper Leak Case Accused: टीईटी परीक्षा पेपर फुटीप्रकरणात फरार असलेल्या सोनू कुमार दिवाकरने भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 15 वर पोहोचली आहे.
ADVERTISEMENT

भिवंडी: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी (TET) परीक्षा पेपर फुटीप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सोनू कुमार दिवाकर याने सोमवारी अचानक भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला आज (28 जुलै) कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेनंतर टीईटी पेपर फुटीप्रकरणातील अटक आरोपींची संख्या 15 वर गेली आहे.
पेपर फुटीने राज्यभरात उडाली होती खळबळ
टीईटी परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्याने महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ हद्दीत 26 जून रोजी प्रथम तीन आरोपींना अटक करण्यात आली होते. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.
हे ही वाचा>> महाराष्ट्र TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अटकेत, आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक
मुख्य सूत्रधारासह 15 आरोपी जाळ्यात
या प्रकरणात यापूर्वी 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याचाही समावेश आहे. अटक आरोपींपैकी 12 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजीत सिंग उर्फ पिकू हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी सोनू कुमार दिवाकर हा पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र, मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याला अटक झाल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, या भीतीने त्याने अखेर भिवंडी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केले.
