क्रिकेट सामन्यात हत्याकांड! क्लीन बोल्ड केलं म्हणून गोलंदाजाचा घेतला जीव
काही मुलं क्रिकेट खेळत होती. यादरम्यान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर त्याने मैदानातच गोलंदाजाचा जीव घेतला.

Crime News : खेळामुळे खिलाडूवृत्तीचा गुण जोपासला जातो असं म्हणतात, पण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये क्रिकेट खेळताना घटनेने एकच खळबळ उडाली आहे. क्रिकेट खेळत असताना फंलदाजाने गोलंदाजाची हत्या केली. काही मुलं क्रिकेट खेळत होती. यादरम्यान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर त्याने मैदानातच गोलंदाजाचा जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी मुलाचं नाव हरगोविंद असून, मृत्यू झालेल्या मुलाचं नाव सचिन असं आहे.
हेही वाचा >> अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांना बाल्लेकिल्ल्यातच धक्का!
घटमपूर परिसरातील रेवन्ना भागातील डेरा राठी खला सा गावात ही घटना घडली आहे. सोमवारी (19 जून) सायंकाळी पाचच्या सुमारास गावात काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळ सुरू असताना हरगोविंद फलंदाजी करत होता आणि सचिन गोलंदाजी करत होता.
क्लीन बोल्ड केल्यामुळे राग झाला अनावर
हरगोविंद फलंदाजी करत असताना सचिन गोलंदाजीला आला. सचिनने टाकलेल्या चेंडूवर हरगोविंद क्लीन बोल्ड झाला. आपल्याला बाद केल्याचा हरगोविंदला चांगलाच राग आला. चिडलेला हरगोविंदने सचिनसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. दोघांचा मैदानावरच वाद सुरू झाला.
खेळाच्या मैदानात केला खून
भांडण सुरू असतानाच हरगोविंदचा भाऊही घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर दोघांनी मिळून सचिनला पकडले. दोघांना त्याचा इतका राग आला की त्यांनी सचिनचा गळा आवळून खून केला. हत्येची माहिती मिळताच सचिनच्या कुटुंबीय मैदानावर आले. त्यांनी सचिनला घाटमपूर रुग्णालयात नेले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा >> BMC: उद्धव ठाकरेंना घेरलं, ‘त्या’ प्रकरणी फडणवीसांकडून प्रचंड मोठी घोषणा
पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले
याबाबत एसीपी दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, ‘मृतांच्या नातेवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तक्रारीप्रमाणे एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल.’ दरम्यान, सचिनची हत्या केल्यानंतर आरोपी हरगोविंद आणि त्याचा भाऊ फरार झाले आहेत.