Beed: तुमचंही डोकं फिरेल अशी घटना... 13 वर्षाच्या मुलाचा अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 13 वर्षीय शाळकरी मुलानेच हे घृणास्पद कृत्य केलं आहे.
ADVERTISEMENT

रोहिदास हातागळे, अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवार, 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्वानाच चक्रावून टाकणारी ही घटना घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गावातीलच 13 वर्षीय शाळकरी मुलावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(1), 65(2) तसेच POCSO कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित बालिका आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत असताना आरोपी अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने बुधवारी (1 एप्रिल) सकाळी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुरावे गोळा करण्याचे कामही जोरात आहे.
अवघ्या आठवड्यात दुसरी घटना
ही घटना येथील जनतेमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे. अवघ्या आठवड्यापूर्वीच डोंगर पिंपळा येथे 15 वर्षीय एका मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. दोन्ही घटनांमुळे अंबाजोगाई तालुका आणि संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. स्थानिक नागरिकांनी बालकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.









