मिसिंगच्या घटना अन् अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, हादरवून टाकणाऱ्या घटनेने बीडमध्ये खळबळ

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात डिघोळआंबा शिवारातील जुन्या तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय असून पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

beed kej unknown dead body found digholamba murder attempt to destroy evidence
बीडमध्ये एका व्यक्तीची हत्या
Google CTA

बीड: बीड जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तींच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच केज तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिघोळआंबा शिवारातील एका जुन्या तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, हत्येनंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. 25 नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील डिघोळआंबा शिवारात कानडी बदनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुना तलाव आहे. या तलावात 25 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ हत्या नसून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा>> पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. मृतदेहाची ओळख पटवणे आणि या हत्येमागील कारणांचा शोध घेणे हे सध्या पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.

हे ही वाचा>> पुणे: कोयत्याने अक्षरश: हात तोडले.. कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेचं नेमकं झालं तरी काय?

मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आव्हान

दरम्यान, मृत व्यक्ती कोण आहे, ती कुठून आली होती आणि तिची हत्या कोणी केली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा मृत व्यक्तीची ओळख पटत असल्यास त्यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तींच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.