रात्री घरी परतत होती, पोलिसाने बलात्कार करुन केली हत्या; 10 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी गोरखपूरमधून अपहरण झालेल्या 10 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून डायल 112 वर तैनात असलेल्या निलंबित हवालदार अभिषेक यादवला अटक केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह नदीजवळून ताब्यात घेण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री घरी परतत होती
पोलिसाने बलात्कार करुन केली हत्या
10 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?
Crime News : एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 28 जुलैच्या रात्री बेपत्ता झालेल्या एका 10 वर्षांच्या बालिकेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गोरखपूर पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या 'डायल 112' पथकात तैनात असलेला शिपाई अभिषेक यादव याला अटक केली आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि त्याच्या मोटारसायकलचा क्रमांक ट्रेस करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी गाझीपूरचा रहिवासी असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चिऊटहा पुलाजवळ नदीपात्रातून मुलीचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे.
दवाखान्यातून परतताना पोलीस शिपायाने साधला डाव
मूळचे आझमगड येथील रहिवासी असलेले पीडित कुटुंब जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या मोठ्या मुलीसाठी जेवण घेऊन आले होते. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची 10 वर्षांची छोटी मुलगी दीपिका एकटीच घराच्या दिशेने निघाल्यावर, गणवेशात असलेल्या आरोपी पोलीस शिपायाने तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून फुस लावली आणि आपल्या अपाचे मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. मुलगी अचानक गायब झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती न सापडल्याने शेवटी पोलिसांत फिर्याद नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्परतेने तपास सुरू केला होता.
हे ही वाचा : 'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया
मुलीसोबत गैरवर्तन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिपाई अभिषेक यादव याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. 3 फेब्रुवारी 2025 रोजी एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात तो निलंबित झाला होता आणि त्याला तुरुंगातही जावे लागले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा 'डायल 112' च्या सेवेत कार्यरत झाला होता. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन आणि जबरदस्ती केल्याचे समोर आले असून, पोलीस सध्या त्याची अधिक चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
एनएसएनुसार कठोर कारवाई
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कडक शिक्षा मिळवून दिली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिपायाला पोलीस सेवेतून कायमचे निष्कासित (बडतर्फ) करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (एनएसए) कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि अशी विकृत मानसिकता ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन अत्यंत कठोर कायदेशीर पावले उचलत आहे.
