बोलत नाही म्हणून नृत्यांगनेवर कोयत्याने हल्ला, रक्तरंजित घटनेने जामखेड परिसरात खळबळ
"फोनवर बोलत नाहीस, नंबर ब्लॉक का केला?" असं म्हणत रागाच्या भरात एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बोलत नाही म्हणून नृत्यांगनेवर कोयत्याने हल्ला
रक्तरंजित घटनेने जामखेड परिसरात खळबळ
Ahilyanagar Crime: "फोनवर बोलत नाहीस, नंबर ब्लॉक का केला?" असं म्हणत रागाच्या भरात एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. या हल्ल्यात संबंधित नृत्यांगना गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय 26, व्यवसाय – नृत्यांगना, मूळ रा. वाघोली, जि. पुणे, सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी पीडित महिलेची ओळख समोर आली असून ती तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
पीडिता गायत्री सावंत ही नृत्यांगनेचे काम करून आपली उपजीविका करते. वृत्तानुसार, गायत्री सावंत हिचे आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी गेल्या पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र 2024 सालापासून हे संबंध तुटले आहेत. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात एक गुन्हा दाखल केला होता. गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून "तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस तर तुला मारून टाकीन", अशी धमकी दिली होती.
घरात घुसून पीडितेवर कोयत्याने हल्ला...
तेव्हा महिलेने त्याचा फोन कट केला. त्यानंतर शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गायत्री सावंत ही तिच्या रूममध्ये मैत्रीण मनिषा जावळे हिच्यासोबत होती आणि त्यावेळी मनिषा बाल्कनीत गेली असता आरोपी राहुल कचरे हा तेथे दबा धरून बसलेला होता. त्यानंतर तो कोयता हातात घेऊन पीडितेच्या रूममध्ये घुसला. "तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?" असे म्हणत त्याने फिर्यादी महिलेच्या बोटांवर, हातावर व डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.










