पुण्यातला 'मुळशी पॅटर्न' कसा आहे?, पुणेकरांना हादरवून टाकणारा गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास!
Pune Gang War: वनराज आंदेकरच्या हत्येनंतर पुण्यातील गँगवॉर हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्यातील गॅंगवॉरचा नेमका रक्तरंजित इतिहास
पुण्यातील गँग आणि वाढते गुन्हेगारी
पुण्यातील गँगचा मुळशी पॅटर्न
पुणे: तुम्ही 'मुळशी पॅटर्न' सिनेमा पाहिला असेल. या सिनेमात एक सीन आहे ज्यात एका गुंडाच्या मागे टोळी लागलेली असते, तो गुंड शहरातल्या वेगवेगळ्या भागांमधून धावतो, अखेर मंडई भागामध्ये एक अल्पवयीन मुलगा त्याची गोळ्या झाडून हत्या करतो. हा सिनेमातला जरी सीन असला तरी हे एकेकाळचं पुण्यातलं वास्तव होतं. सास्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला गॅंगवॉरचा शाप देखील आहे. या गॅंगवॉरच्या मागे आहे पुण्यातले वाढते जमिनीची भाव आणि आपल्या एरियात वर्चस्व गाजवण्याची ईर्ष्या. (how is mulshi pattern in pune bloody history of gang war will shake people of pune vanraj andekar sharad mohol gaja marne)
या वर्षाच्या सुरुवातीलाच शरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ गोळया झाडून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर रविवारी (1 सप्टेंबर) वनराज आंदेकर यांची त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दशकांपासून पुण्यातलं गॅंगवॉर संपायचं नाव घेत नाहीए.
ADVERTISEMENT
या पुण्याच्या गॅंगवॉरचा मोठा रक्तरंजित इतिहास आहे. हा इतिहास नेमका काय आहे आणि पुण्यातलं गँगवॉर नेमकं का सुरु झालं हेच आपण जाणून घेऊया.
रक्तरंजित पुणे...
घराजवळ मित्रासोबत बेसावध थांबलेल्या वनराज आंदेकराची अवघ्या तीस सेकंदांमध्ये हत्या करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी आंदेकरवर गोळीबार केला. इतकंच नाही तर टोळक्यांनी त्यांच्यावर तलवारीने वार देखील केले. या हल्ल्यात वनराज आंदेकरचा मृत्यू झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Vanraj Andekar: 'पोरं बोलावून तुला ठोकतेच', बहीण फक्त बोलली नाही... 24 तासातच भावाचा केला गेम!
पोलीस तपासातून आंदेकरच्या बहिणीनेच त्यांचा काटा काढल्याचं समोर आलं. प्रॉपर्टी आणि जुन्या रागामधून हा खून केल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी वेगवेगळ्या अँगलने पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.
टोळक्याने येऊन कोयत्याने वार करण्याची पुण्यातली ही काही पहिलीच घटना नाहीये. या वर्षाच्या सुरुवातीला गुंड शरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर देखील पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पुण्यातल्या कोयत्या गँगच्या बातम्या या नेहमी येत असतात. हे सगळं सुरु असताना आता आंदेकरची हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
पुण्याला गँगवॉरचा मोठा इतिहास राहिला आहे. पुण्यात खऱ्या अर्थाने गँग सुरु झाल्या त्या 80 च्या दशकांमध्ये. यावेळी खंडणी वसूल करणं, मटके चालवणं आणि आपल्या भागात वर्चस्व गाजवणं असं सगळं त्याचं स्वरुप होतं. पण पुणं जसजसं वाढायला लागलं त्यानंतर पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या गँग उदयास येऊ लागल्या.
ADVERTISEMENT
पुण्यात 90 च्या दशकात आणि त्याच्या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढू लागली. आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पुण्यात विस्तारलं. अशा आयटी पार्कसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींची गरज होती आणि या जमिनी मिळवण्यासाठी एजंट लोकांची गरज भासू लागली. या सगळ्यातून पुण्यात गँगचा जन्म झाला.
हे ही वाचा>> Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमसोबत आमदार पती वागला गुलीगत; म्हणाल्या त्याने…
पुढे या आयटी पार्कवर देखील आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर आयटी पार्कच्या अनेक व्यवहारांमध्ये या गँगने हस्तक्षेप केला. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणे हायवेवर गजा मारणेची काढलेली रॅली तुम्हाला आठवत असेल. या रॅलीत शेकडो तरुण पोरं सहभागी झाली होती. या गजा मारणेचं देखील एकेकाळी पुण्यात वर्चस्व होतं.
गजानन मारणे उर्फ गजा मारणे आणि घायवळ टोळीचा निलेश घायवळ हे दोघं खरंतर जवळचे मित्र होते. या दोघांना आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं. यातूनच या दोघांमध्ये संघर्ष उभा राहिला. एकमेकांचे टोळीतले लोक हेरुन त्यांचा खून करणं अशी प्रकरणं पुण्यात सुरु झाली. या गुंडांची खून करण्याची पद्धतही वेगळी होती. रिव्हॉलव्हर न वापरता या गुंडांनी कोयता वापरण्यास सुरुवात केली. पुण्यातल्या चौकाचौकांमध्ये अशा अनेक निघृर्ण हत्या होण्यास सुरुवात झाली.
साधारण 2010 साली झालेल्या कुडले खून प्रकरणात 26 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. हे सगळे घायवळ टोळीतले असल्याचं सांगण्यात येतं. पुण्यातल्या दत्तवाडी भागापासून ते पर्वतीपर्यंत तेव्हा गोळीबार झाला होता. असं असलं तरी पुरव्यांअभावी या आरोपींची सुटका झाली होती.
असाच प्रकार 2014 मध्ये देखील घडला होता. अमोल बधे याचा गोळीबारात खून करण्यात आला होता. या खुनामागे मारणे गँग असल्याचं म्हटलं होतं.
2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळची बाबा बोडगे गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध रंगलं होतं.
बोडकेच्या हत्येनंतर मारणे गँगने संदीप मोहळची हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळने किशोर मारणे याची हत्या केली. या गुन्ह्यात शरद मोहोळला अटक देखील झाली होती. जामीनावर बाहेर असताना या वर्षाच्या सुरुवातीला शरद मोहोळची देखील काही तरुणांकडून हत्या करण्यात आली.
या गँगवॉरमुळे पुणे हादरलेलं असताना मधल्या काळात पोलिसांनी या गँगवर वचक बसवला होता. या गँगमधील अनेक म्होरक्यांना पोलिसांनी अटक केली होती. असं असलं तरी आता पुन्हा नव्या टोळ्या पुण्यात सक्रीय झाल्या आहेत. अल्पवयीन मुलं या टोळक्यांमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या भागामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडण्याचे प्रकारही पुण्यात वाढले आहेत.
या सगळ्या गुन्हेगारीचे रिल्स देखील या तरुणांकडून बनवले जात आहेत. त्यामुळे आरोपी जरी अटक झाले तरी त्यांच्याविरोधातील चार्जशिट पोलिसांनी योग्य पद्धतीने दाखल करण्याची गरज बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पोलीस या गँग्सचा कसा बंदोबस्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT