जामखेडमधील कलाकेंद्रावर टोळक्याचा हल्ला, विनयभंग करत खंडणीची मागणी; चौघांवर गुन्हा दाखल
Jamkhed Crime : जामखेडमधील कलाकेंद्रावर टोळक्याचा हल्ला, खुर्च्यांची तोडफोड अन् विनयभंग करत खंडणीची मागणी; चौघांवर गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जामखेडमधील कलाकेंद्रावर टोळक्याचा हल्ला

विनयभंग करत खंडणीची मागणी; चौघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील एका कला केंद्रावर चार जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री कोयत्यांच्या धाकावर दहशत माजवली. थिएटर मालकाकडे दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची मागणी करत त्यांनी खुर्च्या, टेबल आणि दुचाकींची तोडफोड केली. याचदरम्यान नृत्य सादर करणाऱ्या मुलींची छेडछाड केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
“आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे"
या प्रकरणी पीडित नृत्यांगनेने जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ५) रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (सर्व रा. आष्टी) आणि अक्षय उर्फ चिंग्या मोरे (रा. जामखेड) हे कोयते घेऊन कला केंद्रात घुसले. “आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे, नाहीतर थिएटर बंद पाडू,” असा धमकीचा सूर त्यांनी लावला. त्यानंतर त्यांनी कोयत्याने खुर्च्या, टेबल आणि दोन दुचाकींची तोडफोड केली.
दरम्यान, आरोपींनी नृत्य करणाऱ्या मुलींची छेड काढत फिर्यादीचे कपडे फाडून तिचा अपमान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याआधी सायंकाळी सुमारे सात वाजता आरोपींनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लावलेले बॅनर फाडले तसेच बीड रोडवरील एका हॉटेलमध्येही तोडफोड केली होती.