हादरवून टाकणारी बातमी.. महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख सापडला अत्यंत भयंकर गुन्ह्यात, थेट पंजाबमध्ये अटक!
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध शस्त्र प्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानातील कुख्यात टोळीशी त्याचा संबंध असल्याचाही आरोप आहे. पण त्याच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT

विजय बाबर, सोलापूर: कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी सामन्यात पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निकालामुळे सिकंदर शेख हा प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता याच सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी थेट शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पपला गुर्जर टोळीशी थेट संबंध
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान यामध्ये तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली.
दानवीरवर खून व दरोड्याचे गुन्हे
पोलीस तपासात उघड झाले की, या घटनेतील मुख्य आरोपी दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, एटीएम फोड, आर्म्स अक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सक्रिय सदस्य असून, यूपी आणि मध्य प्रदेशातून शस्त्रं आणून पंजाबमध्ये पुरवण्याचे काम तो करत होता.














