धक्कादायक! 'पत्नीच्या गर्भपाताला आई जबाबदार...' रागाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं
अंधश्रद्धेच्या कारणावरून एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आपली आई जादू-टोणा करत असल्याचा आरोपी तपनला संशय होता. खरं तर, आरोपीच्या पत्नीचा वारंवार गर्भपात होत होता आणि आपली आईच पत्नीच्या समस्येसाठी कारणीभूत असल्याचा त्याला संशय होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीच्या गर्भपाताला आई जबाबदार असल्याचा मुलाचा संशय
रागाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं
Crime News: अंधश्रद्धेच्या कारणावरून एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. हे प्रकरण परिसरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बेतनाटी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या कलाराफुलिया गावात घडली. प्रकरणातील आरोपीचं नाव 35 वर्षीय तपन बारिक असून त्याची आई म्हणजेच मृत महिलेची ओळख 48 वर्षीय रायमणि सिंह असल्याची समोर आली आहे.
पत्नीचा वारंवार गर्भपात
आपली आई जादू-टोणा करत असल्याचा आरोपी तपनला संशय होता. खरं तर, आरोपीच्या पत्नीचा वारंवार गर्भपात होत होता आणि आपली आईच पत्नीच्या समस्येसाठी कारणीभूत असल्याचा त्याला संशय होता. याच गोष्टीवरून, घरात बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. शेवटी, घरातील सततच्या वादाला कंटाळून तपनची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच घर सोडून गेल्याचं सांगितलं जात आहे.
आईला जबाबदार धरत तिची निर्घृण हत्या
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही काळापासून तपनच्या वागण्यात वेगळाच बदल जाणवत होता. त्याचं वागणं योग्य वाटत नव्हतं. तो बऱ्याचदा त्याच्या आयुष्यातील समस्या आणि दुर्दैवासाठी त्याच्या आईला जबाबदार धरायचा. बुधवारी (28 जानेवारी) सकाळच्या सुमारास घरात आई आणि मुलामध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी, रागाच्या भरात आरोपी तपनने त्याच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्या हल्ल्यात पीडितेचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा: भाडेकरुंच्या गोड बोलण्याला भुलली! पण घडलं असं की मालकिणीला गमवावा लागला जीव; वाचा नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी तपासादरम्यान, पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेलं शस्त्र सुद्धा जप्त केलं असून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आता, मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केवळ अंधश्रद्धेमुळे केली की आरोपीची मानसिक स्थिती यामागे कारणीभूत आहे? याचाही पोलीस तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे.










