बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगून थकला, शेवटी 20 हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन पोहोचला बँकेत; नेमकं काय घडलं?
एक व्यक्ती बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर असलेले पैसे काढण्यासाठी बँकेत गेला. मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांनी तिच्या मृत्यूचं प्रमाणपत्र मागितलं. तो व्यक्ती अशिक्षित असल्याने त्याला ते समजलं नाही. शेवटी कंटाळून त्या व्यक्तीने बहिणीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून बँकेत नेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगून थकला
शेवटी 20 हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन पोहोचला बँकेत
नेमकं काय घडलं?
Man takes sister's skeleton to bank : एका आदिवासी व्यक्तीने सोमवारी (27 एप्रिल) आपल्या मृत बहिणीच्या नावावर जमा असलेले पैसे काढण्यासाठी तिचा सांगाडा बँकेत आणला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना ओडिसाच्या केओन्झर जिल्ह्यातील पाटना ब्लॉकमध्ये असलेल्या 'ओडिशा ग्रामीण बँके'च्या मालीपोसी शाखेत घडली. जीतु मुंडा (50, रा. दियानाली गाव) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मोठी बहीण कालरा मुंडा (56) हिच्या बँक खात्यातून तो 20,000 रुपये काढण्याचा प्रयत्न करत होता. कालरा मुंडा यांचा दोन महिन्यांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यांनी जनावरे विकून हे पैसे कमावले होते.
बहिणीचा सांगाडा उकरुन बाहेर काढला
दुसरा कोणताही कायदेशीर वारस नसल्यामुळे, मुंडा यांनी काही दिवसांपूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेशी संपर्क साधला होता. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, मुंडा आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी स्मशानभूमीतून आपल्या बहिणीचा सांगाडा उकरून बाहेर काढला.
हे ही वाचा : मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?
पत्रकारांना काय सांगितले?
अशिक्षित असलेल्या जीतु मुंडा यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मी अनेकदा बँकेत चकरा मारल्या, पण तिथल्या लोकांनी मला सांगितले की ज्यांच्या नावावर पैसे जमा आहेत त्या खातेदाराला घेऊन या. मी त्यांना सांगितले की तिचा मृत्यू झाला आहे, तरीही त्यांनी माझे ऐकले नाही आणि तिला बँकेत आणण्याचा आग्रह धरला. त्यामुळे नैराश्यातून मी तिची कबर खोदली आणि तिच्या मृत्यूचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा बाहेर काढला.'
हे ही वाचा : जालना : अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं
पोलीस करणार मदत
माहिती मिळताच बँकेत पोहोचलेले पाटना पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (IIC) किरण प्रसाद साहू म्हणाले, 'जीतु हा एक अशिक्षित आदिवासी माणूस आहे. त्याला कायदेशीर वारस किंवा वारसदार काय असतो हे माहित नाही. मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात बँक अधिकारी अपयशी ठरले आहेत.' मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी जीतु मुंडा यांना त्यांच्या मृत बहिणीच्या बँक खात्यातून पैसे मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत तो सांगाडा पुन्हा स्मशानभूमीत दफन करण्यात आला.









