पुण्यात चाललंय तरी काय? युपीचा नराधम, मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणीला...
Pune crime news : पुण्यातील सुखसागर नगर परिसरात मैत्रिणीची वाट पाहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात चाललंय तरी काय? युपीचा नराधम,
मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणीला...
Pune Crime News : पुण्यातील सुखसागर नगर परिसरात मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या 18 वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी या परिसरात आली होती. मैत्रीण येण्यास वेळ असल्याने ती रस्त्याच्या बाजूला थांबून तिची वाट पाहत होती. याच वेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या आसपास फिरू लागला. त्याने सुरुवातीला तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाजूला थांबणे पसंत केले. मात्र, त्यानंतरही तो तिच्या जवळ आला आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Personal Finance: सरकारला कर्ज देऊनही कमावता येतो पैसा! जाणून घ्या सरकारी बाँड्सचं गणित
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अवघ्या एका मिनिटात हा प्रकार घडला
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती घटनास्थळी पोहोचल्यानंतर अवघ्या एका मिनिटात हा प्रकार घडला. आरोपीने अचानक तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिची मैत्रीण तिथे पोहोचली. तिने आरोपीला ढकलले. तरुणीनेही प्रतिकार केल्याने ती खाली पडली. या प्रकारात तिच्या हाताला आणि शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. आरोपी तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच तरुणीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. नागरिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असताना त्याने एका व्यक्तीचा मोबाईल फोडल्याचा तसेच काही जणांना शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा : Karjat Forest Cutting Ground Report : सह्याद्रीतील कर्जतच्या गावकऱ्याने सांगितली कंपनीची insideस्टोरी
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची तरुणीची मागणी
या प्रकरणातील आरोपीचे नाव जीतू किशोरीलाल सरोज असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त पुण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तरुणीने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मैत्रीण वेळेत तिथे पोहोचली आणि स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे तरुणीने सांगितले. आरोपीला ती यापूर्वी कधीही भेटली नव्हती. परिसरातील काही नागरिकांनीही त्याला यापूर्वी फारसे पाहिले नसल्याचे सांगितले. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी थांबलेल्या तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे शहराची ओळख एकेकाळी सुरक्षित आणि शिक्षणासाठी अनुकूल शहर अशी होती. मात्र, अलीकडच्या काळात शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कोयते घेऊन फिरणे, वाहनांची तोडफोड, अमली पदार्थांशी संबंधित घटना आणि महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारी यांसारख्या घटनांची चर्चा सातत्याने होत आहे. सुखसागर नगरमधील घटनेत सायंकाळची वेळ असूनही तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणीची सुटका झाली. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
