'मंदिरातून धूर येतोय...' गावकरी बघायला गेले अन् हादरले, कुणाच्या चिता जळत होत्या?

मुंबई तक

गावाजवळ असणाऱ्या एका मंदिरातून धूर निघत असताना गावकऱ्यांना दिसला. ते पाहण्यासाठी गेले असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन चिता जळत असल्याचं त्यांना दिसलं. शाहजहानपूरमध्ये नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मंदिरातून धूर येतोय...

point

गावकरी बघायला गेले अन् हादरले

point

कुणाच्या चिता जळत होत्या?

Crime News : एका मंदिरात दोन साधूंची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावच्या मु्ख्य वस्तीपासून एक किमी अंतरावर हे मंदिर आहे. गुरुवारी (1 ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास गावापासून या मंदिरातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचताच मंदिरातील दृश्य पाहून नागरिक सुन्न झाले. मंदिरात एका साधूचा मृतदेह जळत होता, तर दुसऱ्या साधूचा मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा झाला होता. दोन्ही मृतदेह एकमेकांपासून अवघ्या 10 मीटर अंतरावर पडलेले होते. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि का केली, जाणून घ्या.

कोण होते ते दोन साधू?

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल दास (70) हे कथावाचक होते आणि गेल्या 20 वर्षांपासून या मंदिरात राहत होते. तर सुथा गावातीलच रहिवासी असलेले बिहारी दास (60) हे महिनाभरापूर्वीच गोपाल दास यांचे शिष्य बनून त्यांच्यासोबत या मंदिरात राहू लागले होते. आरोपींनी या दोघांची हत्या केल्यानंतर घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने लाकडाची चिता रचून दोन्ही मृतदेह पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

हे ही वाचा : एक कोटीच्या विम्यासाठी गरोदर पत्नीचा घात! आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवऱ्याचा भयानक डाव

कोणी केली हत्या?

या प्रकरणी मंदिराचे संरक्षक शिवकुमार सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बिहारी दास यांचा पुतण्या सुमित सिंह याने मंदिर बळकावण्याच्या आणि ताबा मिळवण्याच्या हेतूने ही आग लावून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 35 वर्षीय आरोपी सुमित विवाहित असून त्याला 10 वर्षांची जुळी मुले आहेत. पोलीस तपासात आरोपी सुमित हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी सुमितला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : जवळ जवळ अर्ध्या राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज

ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दोन्ही साधूंचा मृत्यू नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कसा झाला, याचा सविस्तर खुलासा पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.