Pune: नाना पेठेत गँगवार, बदला घेण्यासाठी आरोपीच्या मुलालाच केलं ठार.. पुण्यात पोलिसांची भीतीच राहिली नाही?
Pune Gangwar Govind Komkar Murder: वनराज आंदेकर यांच्या खुनाने पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील अंतर्गत संघर्ष आणि कौटुंबिक वाद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Pune Gangwar Govind Komkar Murder: पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या टोळी युद्धाने आज (5 सप्टेंबर) पुन्हा एकदा अवघ्या पुण्याला हादरवून टाकलं आहे. गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येलाच भर रस्त्यात टोळी युद्धातून एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत संध्याकाळच्या वेळेस बरीच रहदारी असताना ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी तीन गोळ्या झाडल्या ज्यामध्ये गोविंद कोमकर याचा जागीच मृत्यू झाला. मृत गोविंद कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा असल्याचे समजतं आहे. गणेश कोमकर हा वर्षभरापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता. नुकतंच वनराज आंदेकरांच्या हत्येचा घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना त्याचा बदला म्हणून गोविंद कोमकरची हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> पुण्यातला 'मुळशी पॅटर्न' कसा आहे?, पुणेकरांना हादरवून टाकणारा गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास!
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक हा गणेश कोमकर होता. त्यामुळे आता त्याच्याच मुलाची हत्या करून आंदेकर खुनाचा बदला घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील टोळी युद्धाचा भडका पुन्हा एकदा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरण
पुण्यातील नाना पेठेतील डोके तालीम परिसरात 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर 14 ते 15 हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृण हल्ला केला होता. या हल्ल्यात गोळीबार आणि कोयत्याने वार करून आंदेकरांना संपवण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात या खुनामागे कौटुंबिक वाद, संपत्तीवरील तंटे आणि टोळी युद्धाचा संबंध असल्याचे समोर आलेले. या प्रकरणात पोलिसांनी एकून २१ जणांना अटक केली होती.










