Loksabha Election 2024: ओमराजे आणि राणांचं वैर! ‘ही’ गणितं ‘धाराशिव’मध्ये खेळ बिघडवणार?
Loksabha Election 2024: धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. पण येथील राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे. जाणून घ्या त्याचविषयी.
ADVERTISEMENT
Loksabha Election 2024: मुंबई: काही मतदारसंघ असे असतात जिथं वर्ष, महिने, आठवडे, प्रत्येक दिवस जणू निवडणुकीचे आणि राजकारणाचेच असतात. गावातल्या पारापासून ते शहरातल्या चौकापर्यंत राजकारणाचे गॉसिप सतत सुरु असतात. इथले नेतेही असेच भन्नाट असतात, लोकांमध्ये असतात, चर्चेत असतात. असाच एक मतदारसंघ आहे उस्मानाबाद अर्थात आता ज्या जिल्ह्याचं नाव बदललं तो धाराशिव मतदारसंघ. ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा झेडपी, पंचायत समिती, मार्केट कमिटी असो नाहीतर विधानसभा किंवा येऊ घातलेल्या लोकसभा. (loksabha election 2024 omraje nimbalkar and ranajagjitsinha patil enmity will these maths spoil the game in dharashiv)
ADVERTISEMENT
सगळ्या इलेक्शनवर इथली लोकं मोक्कार इन्ट्रेस्ट घेऊन असतात, बोलतात आणि अंदाज बांधतात. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विस्तार असलेला हा लोकसभा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ. मात्र 1999 पासून केवळ एकवेळचा अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केलाय तो आजवर कायम आहे. युतीत हा मतदारसंघ सेनेला सुटत असल्यानं भाजपला अजूनतरी हा मतदारसंघ वाट्याला आला नव्हता. त्यामुळं आता भाजपनं इथं जोरात ताकत लावलीय. पक्षांमधील फुटाफुट आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर इथलं गणितही बदललं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना निष्ठेचं फळ मिळणार की भाजपसोबत गेलेल्या राणा जगजितसिंह पाटलांच्या रुपानं भाजपला पहिल्यांदा मतदारसंघ मिळणार यासह अनेक गणितं धाराशिव मतदारसंघात गुंतलेली आहेत. हे गणित काय आहे हेच आपण राजकीय, सामाजिक अंगाने आपण जाणून घेणार आहोत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ म्हणजे धाराशिव ,परांडा,तुळजापूर ,उमरगा तर लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.
हे वाचलं का?
धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा. हैदराबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढलेला, त्यामुळं हवामान मुख्यत: कोरडंच असल्याचं चित्र. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत. उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. पाण्याचा प्रॉब्लेम जरी असला तरी शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. शेतीच्या अनेक समस्या सोबतच बेरोजगारी, उद्योगाचा म्हणावा तसा विस्तार नाही. म्हणावी अशी डेव्हलप न झालेली एमआयडीसी, रोजगार नसल्यानं इथली बरीच मंडळी पुणे, मुंबईला कामानिमित्त स्थलांतरीत झालीय. महामार्गांचं जाळं जिल्ह्यातून जात असूनही म्हणावा असा विकास झालेला नाही, अशी इथल्या लोकांची ओरड आहे. असं असलं तरी लोक प्रत्येक निवडणुकीला गांभीर्यानं घेतात.
कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीचं मंदिर याच जिल्ह्यात. शिवाय येरमाळ्याचं येडेश्वरीचं मंदिर, येडशीतलं रामलिंग मंदिर, हातलाई देवीचे मंदिर, अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, इकडे बार्शीत भगवंत मंदिरही प्रसिद्ध आहे. सोबत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला अलै दर्गा, गडपाटी अशी भाविकभक्तांसाठी अनेक मंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलुन गेलेली असतात. नळदुर्ग, परांड्याचे किल्ले शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देतात. शिवाय शहराशेजारी असलेल्या लेण्यादेखील चर्चित आहेत. अर्थात या सर्वच ठिकाणच्या व्यवस्थेबद्दल नागरिकांच्या तक्रारीदेखील असतातच.
ADVERTISEMENT
असो हा इतिहास सांगण्याचं कारण यासाठी की, इथलं सगळं राजकारण कुठे ना कुठे या सर्व गोष्टींच्या भोवताली फिरत असतं.
ADVERTISEMENT
धाराशिव लोकसभा मतदारसंघानं 1999पासून एका खासदाराला दुसऱ्यांदा कधीच संधी दिलेली नाही. त्याआधी मात्र अरविंद कांबळे चार वेळा, तुळशीराम पाटील तीन वेळा, शिवाजी कांबळे दोन वेळा संधी मिळालीय. सदाशिव श्रृंगारे, मारोतराव सावंत, कल्पना नरहिरे, पद्मसिंह पाटील, रवींद्र गायकवाड आणि आताचे खासदार ओम राजे निंबाळकर यांना एक-एक वेळा लोकसभेत पाठवलंय.
2009 पर्यंत आरक्षित असलेला हा मतदारसंघ खुला झाला. मात्र त्याआधी 99 पासून या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळतोय. मात्र आता हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. शिवसेनेकडून निवडून आलेले ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवलीय तर ओम राजेंकडून पराभूत झाल्यानंतर पवारांचे तेव्हाचे खास असलेले राणा जगजितसिंह यांनी भाजपची वाट धरलीय. ओमराजे आणि राणा जगजितसिंह यांच्यातच इथली खरी रायव्हलरी आहे. असं असलं तरी अद्याप राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जागेवरचा हक्क सोडला नसल्यानं इथं तिकीट कुणाला मिळेल? हा सवाल अजून सुटलेला नाही. मात्र विश्लेषकांच्या मते मुख्य लढत ही ओमराजे विरुद्ध राणा अशीच पाहायला मिळेल.
धाराशिव मतदार संघात विधानसभानिहाय बलाबल पाहिलं तर औसा विधानसभा मतदारसंघ जिथून अभिमन्यू पवार आमदार आहेत. फडणवीसांचे पीए राहिलेले पवार यांची इथं ताकद दिसून आलीय, पवारांनी बसवराज पाटलांचा पराभव करत विधानसभा गाठली होती. आता बसवराज पाटील देखील भाजपमध्ये आले असल्यानं इथून मोठी ताकद ही भाजपच्या लोकसभा उमेदवाराला मिळणार आहे. इथे ठाकरे गटाच्या दिनकर मानेंची ताकद देखील मोठी आहे.
दुसरा मतदारसंघ आहे उमरगा. जिथून ज्ञानराज चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. शिवाय माजी खासदार असलेले रविंद्र गायकवाड यांचीही ताकद इथे आहे, ते देखील शिंदेंच्या सोबत आहेत. त्यामुळं उमरग्यातून मतं खेचणं ओमराजेंसाठी आव्हान असणार आहे. इकडे तुळजापुरात खुद्द राणा जगजितसिंह आमदार आहेत. त्यामुळं अर्थात त्यांची तिथं ताकद जास्त आहे. महायुतीकडून सध्या तरी त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं इथं केलेल्या कामाचा फायदा त्यांना होऊ शकतो. असं असलं तरी ओमराजेंनी देखील तुळजापुरात जनसंपर्क चांगला ठेवलेला आहे. शिवाय इथून काँग्रेसची मदत देखील त्यांना होऊ शकते.
धाराशिव मतदारसंघातून ओमराजेंचे खास दोस्त असलेले कैलास पाटील आमदार आहेत. कैलास पाटलांचं धाराशिव-कळंब भागात चांगलंच वजन आहे. धाराशिवमध्ये स्वता राणा जगजितसिंह यांची देखील चांगली छाप आहे. इकडे परांडा विधानसभा मतदार संघात मंत्री तानाजी सावंत यांचा प्रभाव आहे, असं असलं तरी इथं शरद पवारांच्या सोबत असलेले माजी आमदार राहुल मोटे यांचंही चांगलंच वजन आहे.
आता राहिला बार्शी विधानसभा मतदारसंघ. बार्शीमधून अपक्ष आमदार आहेत राजेंद्र राऊत, ज्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलाय. कधीकाळचे कट्टर शिवसैनिक असलेले राऊत आता फडणवीसांचे खास झाले आहेत. त्यांचं अर्थातच या मतदारसंघात वजन आहे. दुसरीकडे माजी मंत्री असलेले दिलीप सोपल जे कधीकाळचे शरद पवारांचे निष्ठावान होते, ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. सोपलांचाही मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. असं म्हटलं जातं की बार्शीचा लीड ज्याच्याकडे तोच धाराशिवचा खासदार होतो. ओमराजेंनी आपला वावर मागच्या खासदारांच्या तुलनेत बार्शीकडे जास्त ठेवलाय. तसं पाहिलं तर त्यांचे राऊत आणि सोपल दोघांशी संबंध चांगले आहेत. मात्र युतीधर्म म्हणून राऊत युतीच्या उमेदवाराला मदत करतात की ओमराजेंना? यावर इथला लीड ठरले. अर्थात फडणवीस सांगतील त्यालाच मदत असं त्यांचं धोरण असेल असं इथले अभ्यासक सांगतात. दिलीप सोपल यांची एकगठ्ठा मतं आपल्या मागं वळवण ओमराजेंचं काम आहे. शिवसेनेची अर्थात इथले स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा पाठिंबा इथून कोण मिळवतंय हे देखील महत्त्वाचं आहे.
आता मागच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत ओमराजेंनी राणांचा सव्वा लाखाच्या अंतरानं पराभव केलेला. वंचितनं जवळपास एक लाख मतं घेतली होती. अर्जून सलगर हे उमेदवार होते. यंदा अजून तरी वंचितची भूमिका स्पष्ट झालेली नाही. वंचित जर मविआसोबत राहिली तर निश्चितच त्याचा फायदा हा ओमराजेंना होणार आहे. त्यामुळं इथं वंचितचा फॅक्टर देखील महत्त्वाचा मानला जातोय.
ओमराजे आणि राणा या नात्यानं भाऊ. मात्र दोघांमधला वाद विकोपाला गेलाय, जो अनेकदा जाहीर मंचावर देखील दिसून आलाय. धाराशिव मतदारसंघात तसं तर मुख्य लढत ही याच दोघांमध्ये होईल असं चित्र जवळपास निश्चित आहे. असं असलं तरी भाजपकडून इथून राणांसोबत माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांचंही नाव चर्चेत आहे. इथं महायुतीमधला वाद हा मोठा चर्चेचा विषय आहे. कारण शिंदेंचे शिलेदार असलेले मंत्री तानाजी सावंत यांनी ही जागा शिवसेनेची असून शिवसेनाच लढणार असा दावा अनेकदा केलाय. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असेल बोर्ड देखील लागलेले आहेत.
तेरणा कारखाना सावंतांनी चालवायला घेतलाय, ज्याचे 28 हजार सभासद आहेत. ज्याच्याकडे हा कारखाना असतो त्याची सत्ता असते असं देखील इथं बोललं जातं. त्यामुळं भाजपला ही जागा युतीत स्वताकडे आणणं आणि सावंतांची ताकद मागे उभं करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे आता युतीमध्ये गेलेले अजितदादांचे शिलेदार सुरेश दाजी बिराजदार हे देखील ही लोकसभा लढायला इच्छुक आहेत, त्यांनी स्वताच आपल्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळं युतीतले तिन्ही महत्त्वाचे पक्ष इथं रेसमध्ये असल्याचं दिसतंय. त्यामुळं अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. दुसरीकडे मविआकडून सध्या तरी ओमराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. शरद पवार गटाचाही ओमराजेंना पाठिंबा असल्याचं कळतंय. काँग्रेसचीही ताकद ओमराजेंच्या मागे राहिल असं चित्र आहे. अर्थात जागावाटप अजून ठरलेलं नाही, त्यामुळं मविआ आणि महायुती एकत्रितपणे निवडणुका लढले तर ही गणितं आहेत. काही कारणांनी युती किंवा आघाडी झाली नाही तर मात्र सर्वच पक्ष आपापल्या परिने जोर लावेल असं देखील बोललं जातंय. असं असलं तरी आधीच सांगितलंय त्याप्रमाणं मुख्य लढत ही सध्या तरी ओमराजे आणि राणांमध्ये होईल, ज्याकडं जिल्ह्याचं लक्ष आहे.
प्रसिद्धी, दांडगा जनसंपर्क, आक्रमकता आणि लोकांची अचूक नस पकडणे हा खासदार ओमराजेंचा मेन युएसपी मानला जातो. शिवाय महाविकास आघाडी म्हणून फाईट झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रतीची सहानुभूती हा factor ही ओमराजेंसाठी इथं अतिशय पोषक ठरणार आहे. पण दुसरीकडे राणा जगजीत सिंह हे सुद्धा आक्रमक नेते आहेत. फडणवीसांसोबत दादा आणि शिंदेंची ताकद एकत्रितपणे राणांना मिळाल्यास ही फाईट नक्कीच टफ असेल यात वाद नाही
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT