
हर हर महादेव चित्रपट मोठ्या पडद्यावरून आता टिव्हीवर प्रदर्शित झाल्यानं छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा चित्रपटाचा कडाडून विरोध केला आहे. अफजल खान वधाचा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रसंगावर बोट ठेवत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी का नाही दाखवला? असा रोकडा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शकांना केला आहे.
हर हर महादेव चित्रपटाविरोधात छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे भूमिका मांडली. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजेंनी थेट कृष्णाजी भास्कर कुलकर्णीबद्दल सवाल उपस्थित करत दिग्दर्शकांची कोंडी केलीये.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, "शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. पण, चित्रपटात काय दाखवलंय, शिवाजी महाराज बाहेर येतात. खांबाला लाथ मारतात आणि नरसिंहाचा अवतार घेऊन अफजल खानाचा कोथळा काढतात. त्या दोन तीन मिनिटात काय घडलं, ते व्यवस्थित दाखवा ना. शिवाजी महाराज नरसिंहांचा अवतार. अफजल खानासारख्या बलाढ्य माणसाला वर फेकतात आणि मांडीवर घेतात. किती सिनेमॅटिक लिबर्टी? जे फॅक्ट आहेत, ते तुम्ही सांगा," असं म्हणत संभाजीराजेंनी या प्रसंगावरून चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांना फटकारलं आहे.
पुढे संभाजीराजे म्हणाले, "त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. इतिहास दाखवायचा ना, मग तो सुद्धा तितकाच जबाबदार आहे. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नेमलेला माणूस आहे. अफजल खानाने. अफजल खानाने स्वतःची तलवार कृष्णाजी भास्कर कुलकर्णीकडे दिलीये. हे तुम्ही का हर हर महादेव मध्ये दाखवलं नाही. इतिहास दाखवायचा तो चुकीचा दाखवायचा. त्यापेक्षा न दाखवलेला बरा ना. चित्रपट न काढलेला बरा," असा संताप छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला.
"मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. त्यांनी स्वतंत्र इतिहासकारांची एक समिती स्थापन करावी. त्याची नियमावली तयार करावी. आधी महाराष्ट्रात स्क्रीनिंग होऊन मग केंद्रीय समितीकडे स्क्रीनिंगला जावं. आम्हाला त्या केंद्रीय समितीवर काहीही विश्वास नाही. तिथं कोण इतिहासकार बसलाय, याची आम्हाला कल्पना नाहीये. ज्या पद्धतीने हर हर महादेव आलाय किंवा येणारा नवीन चित्रपट," असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य पातळीवर समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
"माझा विरोध निर्माता किंवा दिग्दर्शकाला नाहीये. कुणी काढलाय, त्यालाही माझा विरोध नाहीये. ऐतिहासिक मोडतोड करून चित्रपट काढणं चुकीचं आहे. माझं सगळ्या नेत्यांना माझं म्हणणं आहे की, त्यांनी सांगावं हर हर महादेव मध्ये जे दाखवलं आहे ते 100 टक्के सत्य आहे. तर मी लगेच हर हर महादेवचा विरोध करणं थांबवेन. मी एकटा का विरोध करू. सगळ्या इतिहासकारांनी आज बोलावं", अशी भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी या वादाच्या निमित्ताने मांडली आहे.