वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची हात जोडून माफी का मागितली? काय आहे प्रकरण?

वाचा सविस्तर बातमी, नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या
Marathi actress varsha usgaonkar apologized fisherman committee after controversial statement in Advertisement
Marathi actress varsha usgaonkar apologized fisherman committee after controversial statement in Advertisement

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हात जोडून कोळी समाजाची माफी मागितल्याचं प्रकरण सोशल मीडियावर गाजतं आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर या त्यांच्या अभिनयासाठी आणि त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. सध्या वर्षा उसगावकर या अभिनेते प्रशांत दामलेंसोबत सारखं काही तरी होतंय हे नाटकही करत आहेत. मात्र त्यांना कोळी समाजाची माफी मागावी लागली आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वर्षा उसगावकर यांना का माफी मागावी लागली?

वर्षा उसगावकर यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मासे विक्री करणाऱ्या एका अॅपसाठी जाहिरात केली होती. या जाहिरातीत त्यांनी बाजारात जाताना बऱ्याचवेळा माझी कोळीणींकडून फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाण वास येतो की मी हे पापलेट का घेतले असा प्रश्न पडतो. पापलेट घेऊन निराश झाले या प्रकारची वाक्य वापरली होती. यावरून कोळी समाज आणि खास करून कोळीण महिला चांगल्याच संतापल्या.

मच्छिमार कृती समितीने काय इशारा दिला?

वर्षा उसगावकर यांनी केलेली ही जाहिरात समोर येताच मासे विक्रेत्या कोळी महिलांची वर्षा उसगावकर यांनी माफी मागावी. अन्यथा आम्ही वर्षा उसगावकर यांच्या शूटिंग सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालू असा संतप्त इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी दिला होता. एवढंच नाही तर गोव्यातून आलेल्या वर्षा उसगावकर यांनी महाराष्ट्रातील कोळी समाजातल्या महिलांचा केलेला अपमान खपवून घेणार नाही असंही त्यांनी सुनावलं होतं.

वर्षा उसगावकर यांनी व्हीडिओ शेअर करून मागितली माफी

या सगळ्या गदारोळानंतर वर्षा उसगावकर यांनी App साठी केलेल्या जाहिरातीसंदर्भात एक व्हीडिओ पोस्ट केला. "मी मध्यंतरी एका APP साठी जाहिरात केली होती. या जाहिरातीत माझ्याकडून कोळी समाजाच्या भावना अनावधानाने दुखावल्या असतील तर मी सर्वांची हात जोडून माफी मागते. त्यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या मनात कोळी समाजाबाबत आणि मासे विक्री करणाऱ्या महिलांबाबत नितांत आदर आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागते" असं म्हणत त्यांनी हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

अभिनेते जयवंत वाडकर यांचीही संतप्त प्रतिक्रिया

वर्षा उसगावकर यांनी जी जाहिरात केली त्यानंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर जयवंत वाडकर यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. वर्षाने जाहिरातीत केलेलं विधान की कोळी लोक आम्हाला फसवतात आणि घाणेरडे मासे देतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोळी माणूस असं कधीही करत नाही. ज्या अॅपसाठी जाहिरात केली त्यांना मासे कोण पुरवतं? त्यांनाही आमच्याकडून मासे घ्यावे लागतात असंही जयवंत वाडकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in