राहुल सोलापूरकरची दिलगिरी पण म्हणाला, 'लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र...'
शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याने आता त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. पाहा नेमकं काय म्हणाला.
ADVERTISEMENT

पुणे: 'लाच शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. पण लाच हा शब्द वापरल्याबद्दल मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.' असं म्हणत अभिनेता राहुल सोलापूरकर याने शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
राहुल सोलापूरकरने शिवाजी महाराजांबाबत जे विधान केलं होतं ते समोर आल्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका सुरू झाली. ज्यानंतर रात्री उशिरा फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून राहुल सोलापूरकरने या सगळ्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
आधी वादग्रस्त विधान आणि नंतर दिलगिरी..
'मी अभिनेता राहुल सोलापूरकर.. साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी रिमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्ट मी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका याविषयी काही बोललो.'
'बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रं, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधील आणि औरंगजेबाच्या माणसांच्या जवळच्या काही गोष्टी या ज्या वाचायला, अभ्यासाला मिळाल्या होत्या त्यातील काही गोष्टी सांगून मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्नं दिली, कोणाला पैसे दिले.. काय-काय केलं.. हे सगळं याचं एकत्रिकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या.. कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथून स्वत:ची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला.'










