Eknath Shinde : "माझ्या समर्थनार्थ कुणीही...", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
Ek Nath Shinde:राज्यात मायुतीला मोठं यश मिळालं असून, अवघ्या काही दिवसांमध्ये या सरकारचा शपथविधी देखील पार पडणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्ममंत्री राहणार, फडणवीस पुन्हा येणार की नवा चेहरा देऊन भाजप धक्का देणार यावर लक्ष लागून आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

देवेंद्र फडणवीस की पुन्हा एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्रीपदावर महायुतीत एकमत होईना?
Maharashtra Chief Minister मुंबई : राज्याचं सर्व लक्ष सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता मुख्यमंत्री कोण व्हावा यावरुन महायुतीमध्ये अजूनही बहुमत झालेलं नाही. यासाठीच तिकडे दिल्लीतही घडामोडी सुरू आहेत. मात्र राज्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रह आहे. यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या भेटीसाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर, ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी येताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना न जमण्याचं आवाहन केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे ट्विटमध्ये काय म्हणालेत?
हे ही वाचा >> Maharashtra Election Results : बुथपासून बड्या नेत्यापर्यंत, योग्य मॅनेजमेंट करुन भाजपला यश मिळवून देणारे शिवप्रकाश कोण?
"महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील."
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा कायम असल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दबावतंत्रांचाही वापर होऊ शकतो अशी शक्यता आहे. काल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे उपचार मिळालेले आणि आजारातून बरे झालेले शेकडो रुग्ण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना करणार असल्याचीही माहिती समोर आली होती. तसंच, मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी लावलेले होर्डिंगही बरंच काही सांगून जात आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरच महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला असं अप्रत्यक्षपणे म्हटलं जातं आहे. त्यामुळे शिवसैनिक मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत हे आता लपून राहिलेलं नाही.