'108' रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन मास्क अभावी रुग्ण दगावला : CM शिंदेंच्या गावाशेजारील घटना

रुग्णवाहिकेची दुर्दशा आणि त्यातून उद्भवलेल्या मृत्यूमुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
108 Ambulance
108 Ambulance Mumbai Tak

सातारा : सातारा जिल्ह्यातील तापोळा गावात आरोग्य विभागाच्या 'डायल 108' रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन मास्क अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मारुती रामदेव सपकाळ असे मृत रुग्णाचे नाव असून शिवसेनेचे दिवंगत माजी उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सपकाळ यांचे ते बंधू होते. विषेश गोष्ट म्हणजे या गावापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुळ गाव हाकेच्या अंतरावर आहे.

डायल '108' ही रुग्णवाहिका सेवा भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजीमार्फत राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुरविली जाते. राज्यभरातील शहरी, ग्रामीण, अतिग्रामीण अशा सर्व विभागांमध्ये ही सेवा पुरविली जाते. तापोळा या दुर्गम भागातील गावात देखील या रुग्णवाहिकेकडून सेवा दिली जाते. मात्र रुग्णांना सेवा देणारी रुग्णवाहिकाच स्वतः रुग्ण असल्याचे याबाबत समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसून येते.

रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन मास्कसह मॉनिटर, सक्शन मशिन अशा अनेक गोष्टी बंद अवस्थेत असल्याचे आढळून येते. रुग्णासाठीचा स्ट्रेचरही तुटला असून तो उशांच्या आधार देवून वापरला जात आहे. दरवाजांचीही दुरावस्था झाल्याचे दिसून येते. रुग्णवाहिकेची झालेली ही दुर्दशा आणि त्यातून उद्भवलेल्या मृत्यूमुळे स्थानिकांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेळापूर गावचे सरपंच राम सपकाळ आणि तापोळा गावचे सरपंच आनंदा धनावडे यांनी संबंधित रुग्णवाहिकेमधील व्यक्तींना जाब विचारला. मात्र त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या दुर्गम भागाला भेट दिली होती. या ठिकाणी विशेष वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांच्या निधीचीही घोषणा केली होती. मात्र अद्यापही या विभागातील आरोग्य सुविधेच्या कमतरतेने आणि 108 रुग्णवाहिकेमधील बिघडलेल्या सुविधेने एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा प्रकार समोर येत आहे. दरम्यान, याबाबत आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार जिल्हा आरोग्य विभाग काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in